लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर येथे होत असलेल्या पावसाळी विधिमंडळ अधिवेशनासाठी अस्थायी दवाखाना उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पावसाचे दिवस लक्षात घेऊन सापावरील ‘अॅन्टी स्नेक व्हेनम’ सोबतच कुत्रा चावल्यानंतर दिली जाणारी ‘रेबीज’ लस उपलब्ध असणार आहे. या अधिवेशनात तीन अस्थायी व तीन फिरत्या दवाखान्यातून मेयो, मेडिकलसह आरोग्य विभागाचे १७० डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, कर्मचारी आरोग्य सेवा देणार आहे.अधिवेशनासाठी राज्यभरातून आलेल्या मंत्री, आमदार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य जपण्यासाठी विशेष सोय केली जाते. आतापर्यंत हिवाळी अधिवेशन होत असल्याने थंडीच्या वातावरणाला घेऊन त्या दृष्टीने औषधोपचार उपलब्ध करून दिला जायचा, परंतु यावर्षी पावसाळा असल्याने डेंग्यू, मलेरिया, व्हायरल, सर्दी, खोकल्यांवरील औषधांसह साप व श्वान दंशावरील लसही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. औषधांचा हा साठा विशेष मंजुरीनंतर मेयो रुग्णालय खरेदी करणार आहे.अधिवेशन दरम्यान रविभवन, आमदार निवास व विधान भवनात अस्थायी दवाखाना सुरू केला जाणार आहे.शिवाय, यशवंत स्टेडियम येथील धरणे मंडप, सहा मोर्चाची ठिकाणे व १६० गाळे परिसरात सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभाग व फिरता दवाखाना असणार आहे. पावसाचे दिवस व आजार वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन डॉक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यानुसार मेयो, मेडिकल व आरोग्य विभागाचे १४ फिजिशियन, ४८ वैद्यकीय अधिकारी, ३५ ब्रदर्स व परिचारीका, १७ फार्मसिस्ट, १८ तंत्रज्ञ, सहा इसीजी तंत्रज्ञ व ३२ कर्मचारी आरोग्य सेवेत असणार आहेत. या अधिवेशनात २० रुग्णवाहिका तैनात केली जाणार आहे.
नागपूर पावसाळी अधिवेशन; आरोग्य सेवेत १७० डॉक्टरांसह कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:18 PM
नागपूर येथे होत असलेल्या पावसाळी विधिमंडळ अधिवेशनासाठी अस्थायी दवाखाना उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. सापावरील ‘अॅन्टी स्नेक व्हेनम’ सोबतच कुत्रा चावल्यानंतर दिली जाणारी ‘रेबीज’ लस उपलब्ध असणार आहे.
ठळक मुद्दे‘अॅन्टी स्नेक व्हेनम’ही उपलब्ध असणार फिरत्या रुग्णालयांसह २० रुग्णवाहिका तैनात