नागपूर : मुलांना सुट्या लागल्या की घराघरांत बाहेरगावी, पर्यटनस्थळी, नातेवाइकांकडे जाण्याची प्लॅनिंग सुरू होते. परंतु उन्हाळ्यात रेल्वेगाड्यात गर्दी होऊन कन्फर्म तिकीट मिळत नाही. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई-नागपूर दरम्यान दहा समर स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वेगाडी क्रमांक ०१०३३ साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल दि. ६ मे ते ३ जून २०२३ दरम्यान प्रत्येक शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रात्री १२.२० वाजता सुटून नागपूरला दुपारी ३.३२ वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०१०३४ साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ३० एप्रिल ते २८ मे २०२३ दरम्यान प्रत्येक रविवारी नागपूरवरून दुपारी १.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पहाटे ४.१० वाजता पोहोचणार आहे. दोन्ही रेल्वेगाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, नासिकरोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामनगाव आणि वर्धा येथे थांबा देण्यात आले आहेत. दोन्ही रेल्वेगाड्यांत १ प्रथम श्रेणी वातानुकूलितसह वातानुकूलित टू टायर, ४ वातानुकूलित २ टायर, १५ एसी थ्री आणि २ जनरेटर व्हॅनचा समावेश राहणार आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.
...............