नागपूर : २३ सप्टेंबरला शहरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नागनदीला पूर आल्याने नदीकाठच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. दुसरीकडे नागपूरची ओळख असलेल्या अंबाझरी तलावाचे आयुष्य संपले असल्याचे धक्कादायक निरीक्षण ‘नीरी’ने आधीच नोंदविले आहे. या पार्श्वभूमीवर अंबाझरी तलावाचे बळकटीकरण आणि मजबुतीकरण करण्यासंदर्भात गुरुवारी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
मनपा मुख्यालयात पार पाडलेल्या या बैठकीला अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, नागपूर पाटबंधारे विभाग (दक्षिण)चे मुख्य अभियंता पवार, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बनर्जी, मुख्य लेखा अधिकारी सदाशिव शेळके, उपायुक्त रवींद्र भेलावे, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. नागपूरचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
अभिजित चौधरी यांनी अंबाझरी तलावाच्या बळकटीकरण आणि मजबुतीकरण करण्याच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी अंबाझरी आउटलेट आणि पुढील ५० मीटर परिसरातील पाण्याच्या प्रवाहाला होणारी अडचण, अंबाझरी धरण परिसरातला धोका, येथील वृक्षांची माहिती जाणून घेतली. तसेच तांत्रिक बाबी आणि इतर कार्याबाबत पाटबंधारे विभागामार्फत बळकटीकरण आणि मजबुतीकरण या संदर्भात डिझाईन तयार करू घ्यावे, असे निर्देश दिले. अंबाझरी परिसरात असणाऱ्या वृक्षांची माहिती जाणून घेण्याकरिता अतिरिक्त आयुक्त (शहर), मुख्य अभियंता पाटबंधारे विभाग, मनपाचे उद्यान विभागाचे अधिकारी, वनविभागाचे अधिकारी यांचा समावेश असणारी लहान समिती स्थापन करावी. या समितीने पुढील १५ दिवसांत आपला अहवाल सादर करावा, असे निर्देशही चौधरी यांनी दिले.