नागपूर :नागपूर महापालिकेने पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी पीओपी मूर्तीची विक्री आणि साठ्यावर बंदी घातली आहे. गणेश उत्सव तोंडावर आल्याने व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीओपीच्या मूर्ताचा साठा केला आहे.
बजेरीयामध्ये शाहू मूर्ती भंडारच्या प्रशांत शाहू यांनी मोठ्या प्रमाणात मूर्ती बाहेरून बोलावून गोदामात ठेवल्या होत्या. यासंदर्भात महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाला भनक लागली. महापालिकेच्या स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन विभाग व उपद्रव शोध पथकाने दुपारी १ वाजता गोदामावर छापा मारला. या पथकासोबत पारंपारिक मूर्तीकार व हस्तकला कारागीर संघाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.
गोदामात असलेल्या पीओपीच्या मूर्ती उपद्रव शोध पथकाने जप्त केल्या. जवळपास ५०० च्यावर पीओपीच्या मूर्ती गोदामात होत्या. या कारवाई दरम्यान गोदाम मालकाने पथकासोबत वादावादी केल्याने पोलीसही कारवाईच्या स्थळी पोहचले होते. मनपाने जप्त केलेल्या मूर्ती किमान ५ लाख रुपयांच्या असल्याचे बोलले जातेय. या कारवाईमुळे पीओपीच्या मूर्ती विक्रेत्यांमध्ये धडकी भरली आहे.