लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे दयाशंकर तिवारी यांची तर उपमहापौरपदी मनिषा धावडे याची निवड करण्यात आली. तिवारी व धावडे यांना प्रत्येकी १०७ मते मिळाली. काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार रमेश पुणेकर यांना २७ मते पडली. उपमहापौर पदाच्या उमेदवार रश्मी धुर्वे यांना २६ मते मिळाली. बसपाचे महापौर पदाचे उमेदवार नरेंद्र वालदे व उमहापौरपदाच्या उमेदवार वैशाली नारनवरे यांना प्रत्येकी १० मते मिळाली. तिवारी यांनी पुणेकर याचा ८० मतांनी तर धावडे यांनी धुर्वे याचा ८१ मतांनी पराभव केला. पीठासीन अधिकारी व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दयाशंकर तिवारी यांना विजयी घोषित केले. ते शहराचे ५४ वे महापौर आहेत. मंगळवारी मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया पार पडली.
काँग्रेसकडून रमेश पुणेकर व मनोज गावंडे यांनी महापौरपदासाठी तर रश्मी धुर्वे व शिवसेनेच्या मंगला गवरे यांनी अर्ज दाखल केले होते. निवडणुकीपूर्वी मनोज गावंडे व मंगला गवरे यांनी अर्ज मागे घेतल्याने तिरंगी लढत झाली. महापौर संदीप जोशी यांनी राजीनामा दिल्याने महापौरपदाच्या १३ महिन्यांच्या कालावधीसाठी ही निवडणूक पार पडली. भाजपचे सभागृहातील संख्याबळ विचारात घेता महापौरपदी दयाशंकर तिवारी यांची निवड निश्चित होती. परंतु, मनपा इतिहासात प्रथमच ऑनलाईन पद्धतीने महापौरपदासाठी निवडणूक होत असल्याने सत्तापक्षाची चिंता वाढली होती. त्यांनी पक्षाच्या सर्व नगरसेवकांना मुख्यालयात बोलावले होते.
तांत्रिक बिघाडामुळे व्यत्यय
सर्व नगरसेवक मोबाईल, लॅपटॉपवरून प्रक्रियेत सहभागी झालेत. उपस्थितीची नोंद सुरू असतानाच सदस्यांना म्यूट केल्याने आवाज येत नव्हता. यावर सत्तापक्षनेते संदीप जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर ११.३० ला ऑनलाईन यंत्रणेत बिघाड निर्माण झाला. दुरुस्तीसाठी वेळ लागला. त्यानंतर १२.३० ला पुन्हा व्यत्यय आला होता.
.... झोननिहाय मतदान
एकाचवेळी सर्व नगरसेवक सामील होणार असल्याने तांत्रिक बिघाडाची शक्यता होती. त्यामुळे झोननिहाय प्रभागातील नगरसेवकांच्या मताची नोंद पीठासीन अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केली. झोननिहाय मतदानामुळे प्रक्रियेला वेळ लागला.
महापौरांच्या निवडणुकीत पाच जणांचा सहभाग नाही
महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे पुरुषोत्तम हजारे, बंटी शेळके, गार्गी चोप्रा, अपक्ष आभा पांडे, सेनेचे किशोर कुमेरिया मतदान प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत. तर उपमहापौर निवडणुकीत या पाच जणांसह कमलेश चौधरी अशा सहा जणांनी प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. तांत्रिक कारण असल्याचे सांगण्यात आले.
गर्दी हटविण्यासाठी पोलीस
कोरोनाचे संकट कायम असूनही स्थायी समिती सभागृहाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. फिजिकल डिस्टन्स पाळले नाही. अनेकांनी मास्क लावले नव्हते. खर्रा खाऊन अनेकजण आजूबाजूला थुंकत होते. यातून संसर्गाचा धोका लक्षात घेता काही वेळाने पोलीस बोलावण्यात आले. त्यानंतर कक्षाबाहेरील गर्दी हटविण्यात आली.
महापालिकेतील वाद आहे म्हटले जाते,पण भाजपला १०७ मते मिळाली. यातून एकजूट दिसून आली. शिक्षण व आयोग क्षेत्रात काम करावयाचे आहे. विधानसभेचे अधिवेशन होते, पिंपरी चिंचवड उपमहापौर पदाची निवडणुक ऑफ लाईन होते. मग नागपूर महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने का घेतली, नागपूरला दुसरा न्याय का, असा सवाल दयाशंकर तिवारी यांनी केला.
मावळत्या महापौरांनी केले अभिनंदन
महापौर व उपमहापौरपदी विजयी झाल्यानंतर दयाशंकर तिवारी व मनिषा धावडे यांचा सत्तापक्ष कार्यालयामध्ये सत्कार करण्यात आला. मावळते महापौर संदीप जोशी यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी आमदार गिरीश व्यास, मोहन मते, प्रवीण दटके, मावळत्या उपमहापौर मनिषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, यांनी अभिनंदन केले.