नागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात प्रभागातील गटार व नाल्या दुरुस्ती, रस्ते दुरुस्तीची कामे होणे अपेक्षित आहे. अन्यथा पावसाळ्यात नागरिकांच्या रोषाला माजी नगरसेवकांना सामोेरे जावे लागणार आहे. त्यात पावसाळा संपल्यावर महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने, माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची धाकधूक वाढली आहे.
एप्रिल महिन्यात निवडणूक होईल. असे गृहित धरून माजी नगरसेवक व इच्छुक कामाला लागले होते. प्रभागातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी फाईल बनविल्या होत्या. आरोग्य शिबिर, विकास कामाचे भूमिपूजन, शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन यात मनपातील सत्ताधारी आघाडीवर होते. कार्यकर्ते कामाला लागले होते. रात्रीच्या पार्ट्या सुरू झाल्या होत्या. यासाठी काही माजी नगरसेवकांनी व इच्छुकांनी लाखो रुपये खर्च केले. मात्र निवडणूक लांबल्याने पुढील सहा-सात महिने हा खर्च करणे शक्य नसल्याने तयारीला लागलेले इच्छुक अचानक प्रभागातून गायब झाले आहेत.
प्रभागातील नागरिक अजूनही माजी नगरसेवकांकडे तक्रारी करीत आहेत. मात्र प्रशासकीय राजवट असल्याने झोनस्तरावरील अधिकारी आता त्यांना जुमानत आहे. दुसरीकडे अधिकाऱ्यांवर दबावही टाकता येत नाही, अशी व्यथा काही माजी नगरसेवकांनी व्यक्त केली. फेब्रुवारी-एप्रिलमध्ये निवडणूक होईल, असे गृहित धरून नियोजन करण्यात आले होते. वातावरण कायम राहावे, यासाठी आरोग्य शिबिर व मेळावे, केंद्र सरकारच्या व्यक्तिगत लाभाच्या योजनांची माहिती देण्यासाठी मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप आहे.
प्रशासन कामाला लागले
प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा आरोप प्रशासनाने फेटाळून लावला आहे. आधीच्या तुलनेत कामाला गती मिळाली आहे. आधी राजकीय हस्तक्षेपामुळे निर्णय घेता येत नव्हता. परंतु आता प्रस्ताव तातडीने मंजूर होत असून, कामाचा बोजा वाढल्याची माहिती मनपातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
निवडणुकीच्या अंदाजानुसार नियोजन
निवडणूक सहा-सात महिने लांबणीवर पडण्याची शक्यता गृहित धरता नव्याने नियोजन केले जात आहे. सलग सहा महिने निवडणुकीचे वातावरण कायम ठेवणे शक्य नाही. निवडणुकीला एक-दोन महिने शिल्लक असताना प्रभागात तयारी करणार असल्याचे एका ज्येष्ठ माजी नगरसेवकांनी सांगितले.