नागपूर : महापालिकेचा पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. प्रारूप प्रभाग रचना, त्यावरील हरकती व सुनावणी, आरक्षण सोडत, अद्ययावत मतदार यादी जाहीर करणे व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा विचारात घेता निवडणुका पुढे ढकलल्या जातील, अशी शक्यता विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी निवडणुका ठरलेल्या वेळेतच होतील, असा विश्वास व्यक्त केला. (Nagpur Municipal Corporation elections likely to postponed ahead?)
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करून मंजुरीसाठी पाठविण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यावर हरकती व सूचना मागवल्या जातील. निवडणूक आयोगाकडून प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यासाठी कालावधी निश्चित करताना आरक्षण सोडतीचा कार्यक्रमही जाहीर होण्याची शक्यता आहे.
प्रभाग रचनेचा केवळ कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना आहेत. गेल्या महापालिका निवडणुकीत ऑक्टोबरमध्ये प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे महापालिकांची अंतिम प्रभाग रचना कधी जाहीर होणार, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे; परंतु निवडणुकीला पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
महापालिकांना केवळ प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. हा आराखडा आयोगाला पाठवायचा आहे. प्रारूप प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर त्यावर हरकती, सूचना मागविणे, हरकतींवर सुनावणी घेणे आणि अंतिम प्रभाग रचना जाहीर करणे, यासाठी साधारणत: महिनाभराचा कालावधी लागतो.
कधी होणार प्रारुप आराखडा?
महापालिका निवडणुकांचा कालावधी पाहता प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे, आरक्षण सोडत काढणे याबाबत अद्यापही राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट आदेश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा कधी तयार होणार, असा प्रश्न नगरसेवक व इच्छुकांना पडला आहे. दुसरीकडे ‘ओबीसी’ आरक्षणाचा विषय प्रलंबित असल्यामुळे महापालिका निवडणुका लांबणीवर टाकाव्यात, अशी मागणी राजकीय पक्षांसह विविध संघटनांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक लांबणीवर पडण्याची चर्चा होत आहे.
आयोगाच्या आदेशानंतर तयारी
राज्य निवडणूक आयोगाकडून प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यासाठी कालावधी निश्चित करताना आरक्षण सोडतीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात येईल. सोडतीनंतर प्रारूप प्रभाग रचना हरकती, सूचनांसाठी प्रसिद्ध होईल. त्याचवेळी मतदार यादी अद्ययावत करणे, मतदान केंद्र तसेच निवडणुकीच्या इतर तयारीसाठी महापालिका प्रशासनाला वेळ लागणार आहे. निवडणूक आयोगाकडून याबाबतचे स्पष्ट आदेश आल्यानंतरच ही तयारी सुरू होणार असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.