लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०२२ मध्ये होऊ घातलेल्या नागपूर महापालिका निवडणुकीवर १० ते १२ कोटींचा खर्च होईल, असा अंदाज आहे. अर्थसंकल्पात यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. बिकट आर्थिक परिस्थितीत मनपाला हा खर्च करावा लागणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी केंद्र वा राज्य सरकारकडून निधी दिला जात नाही. महापालिकांना स्वत: निधीची तरतूद करावी लागते. त्यानुसार मनपाच्या अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचा भत्ता, वाहने व स्टेशनरी यावर खर्च करावा लागतो.
२०१७ मध्ये नागपूर शहरातील मतदारांची संख्या २० लाख ९३ हजार ३९२ होती. निवडणुकीत प्रक्रियेवर मनपा प्रशासनाला प्रत्येक मतदारामागे ३६ रुपये खर्च आला होता. त्यानुसार ७ कोटी ५० लाख खर्च आला होता. २०२२ च्या निवडणुकीत नागपूर शहरातील मतदारांची संख्या २३ लाखाच्या आसपास राहणार आहे. तसेच सातव्या वेतन आयोगामुळे भत्त्यात वाढ झाली आहे. याचा विचार करता निवडणुकीवर १० ते १२ कोटींचा खर्च येईल, असे गृहीत धरून मनपाने आर्थिक नियोजन केले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
शहरालगत लोकसंख्या कमी मतदार अधिक
प्रभाग रचनेसाठी जनगणना कार्यालयाने प्रसिद्ध केलेली लोकसंख्येची सन २०११ ची आकडेवारी विचारात घ्यावयाची आहे. मात्र २०१७ च्या तुलनेत शहरातील लोकसंख्या वाढली आहे. त्यानुसार प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार केला जात आहे. याचा विचार करता शहरालगतच्या भागात लोकसंख्या कमी व मतदार अधिक राहणार आहे.
प्रभागाची संपूर्ण रचना बदलणार
२०१७ साली महापालिका निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार झाली होती. २०२२ मध्ये होणारी निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे. यामुळे प्रभागाची पुनर्रचना केली जाणार आहे. यात विद्यमान प्रभागाची संपूर्ण रचना बदलणार आहे. यामुळे नवीन प्रभागावर अनेकांचे भवितव्य ठरणार आहे.