लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे विकास कामे थांबली आहेत. कोरोना संकटामुळे महसूलही घटला असल्याने मार्च महिन्यापासून देयके मिळाली नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या कंत्राटदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. जुनीच देणी मिळाली नसल्याने नवीन कामे कशी सुरू करायची, अशा चिंतेत कंत्राटदार आहेत.मनपात जवळपास ३०० कंत्राटदार आहेत. २०१९- २०२० या वर्षातील देयके अजूनही मनपा प्रशासनाने अदा केलेली नाहीत. १७५ ते २०० कोटीची ही देयके आहेत. काही देयके वर्षभरापासून प्रलंबित आहेत. देयके न मिळाल्याने मजुरांना देण्यासाठी पैसे नाहीत. त्यात कोरोनामुळे परप्रांतीय मजूर गावाला गेले. तर काही नागपुरातच थांबले. काम बंद असले तरी त्यांना उदरनिर्वाहासाठी पैसे द्यावे लागतात. देयके प्रलंबित असल्याने मजुरांना पैसे कसे द्यावेत, असा गंभीर प्रश्न कंत्राटदारांपुढे ठाकला आहे. मार्च महिन्यात वर्षभरातील थकीत देयके मिळत होती.परंतु यावर्षी मार्च संपला तरी देयके मिळालेली नाहीत. देयके प्रलंबित राहत असल्याने काही कंत्राटदारांनी मनपा आयुक्तांना पत्र लिहून देयके मिळत नसतील तर आम्ही आत्महत्या करायची का, असा सवाल केला आहे. देयके वेळेवर मिळत नसल्याने लहान कंत्राटदारांपुढे गंभीर समस्या उभी ठाकली आहे.अधिकाऱ्यांच्या टेबलवर फायलींचे ढिगारेमागील वर्षातील देयके प्रलंबित तर आहेतच. त्यात जानेवारी महिन्यापासून बिले मिळालेली नाहीत. वित्त विभागातील अधिकाऱ्यांच्या टेबलवर प्रलंबित फायलींचे ढीग लागले आहेत. पंचवीस टेबल फिरून फाईल वित्त अधिकाऱ्याकडे जाते. त्यानंतरही टेबलवर पडून राहते. त्यात त्रुटी काढल्या जातात. हा प्रकार थांबावा, अशी मागणी कंत्राटदारांनी केली आहे.वित्तीय मंजुरी न घेताच कामेमुख्यमंत्री निधीतून १५७ कोटीची शहराच्या विविध भागात कामे करण्यात आली. परंतु वित्तीय मंजुरी न घेताच कार्यादेश काढण्यात आले. कामे केल्यानंतर बिलाची मागणी केली असता यातील अनेक कामांना वित्तीय मंजुरी नसल्याचा प्रकार पुढे आला. मंजुरी नसताना कामे केल्याने देयके कशी मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.महापालिकेतील अडीशे-तीनशे कंत्राटदारांची सुमारे १७५ कोटींची बिले मार्च महिन्यापासून मिळालेली नाहीत. यामुळे कंत्राटदार संकटात आहेत. मजुरांना देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. अशा परिस्थितीत नवीन कामे कशी करावी.विजय नायडू, अध्यक्ष, मनपा कंत्राटदार संघटना
नागपूर मनपा कंत्राटदार आर्थिक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 9:05 PM