लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हॉस्पिटलमधील धोकादायक जैव वैद्यकीय कचरा जमा करून व त्याची जाळपोळ करून उपद्रव पसरवल्याने महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे कामठी रोड इंदोरा येथील श्रीमती निंबुनाबाई तिरपुडे हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटरवर कारवाई करून ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.पर्यावरण संवर्धनासाठी मनपा आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या निर्देशानुसार आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण शहरात पथकाद्वारे कारवाई सुरू आहे. या अंतर्गत आसीनगर झोन पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, सदर हॉस्पिटलवर नव्याने नियुक्त उपद्रव शोध पथकातील कर्मचाऱ्यांमार्फत काही दिवस पाळत ठेवण्यात आली. हॉस्पिटलमधील घातक कचरा अवैधरीत्या व धोकादायकरीत्या नष्ट करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर झोन पथकाद्वारे छापा टाकून तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये हॉस्पिटलच्या मागील जागेमध्ये जैव वैद्यकीय कचरा जमा करून कचरा जाळण्यात आल्याचे दिसून आल्याने कारवाई करण्यात आली.३५० प्लास्टिक पतंग जप्तनॉयलॉन मांजा व प्लास्टिक पतंगबाबतही उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई सुरू आहे. ३ ते ६ जानेवारीदरम्यान शहरातील वेगवेगळ्या झोनमधील पतंग दुकानांवर कारवाई करून ५ नॉयलॉन मांजा चक्री व ३५० हून अधिक प्लास्टिक पतंग जप्त करण्यात आले आहेत. ३ जानेवारीला सतरंजीपुरा झोनमधील ९८ दुकानांची तपासणी करून राणी दुर्गावती चौकातील सलीम खान पतंगवाला या दुकानातील नॉयलॉन मांजाचे ५ चक्र व ५० प्लास्टिकच्या पतंग जप्त करण्यात आल्या. ४ जानेवारीला धंतोली झोन पथकाद्वारे १२ प्लास्टिक पतंग, नेहरूनगर झोनमधील २०, गांधीबाग झोनमधील ५०, सतरंजीपुरा झोनमधील ३०, आसीनगर झोनमधील ३० असे सर्व झोनमधील एकूण १४२ प्लास्टिक पतंग जप्त करून ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आले. ६ जानेवारीला धंतोली झोन पथकाद्वारे कारवाई करून ५५, सतरंजीपुरा झोनद्वारे १२० व लकडगंज झोन पथकाद्वारे ५ किलो प्लॉस्टिक पतंग जप्त करण्यात आले. तिन्ही झोनमध्ये ९१ दुकानांची तपासणी करून १४७ प्लास्टिक पतंगांसह ५ किलोग्रॅम वजनाचे प्लास्टिक पतंग जप्त करीत ६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
नागपूर महापालिका : जैविक कचरा जाळणाऱ्या हॉस्पिटलला ५० हजार रुपये दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 7:49 PM
हॉस्पिटलमधील धोकादायक जैव वैद्यकीय कचरा जमा करून व त्याची जाळपोळ करून उपद्रव पसरवल्याने महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे कामठी रोड इंदोरा येथील श्रीमती निंबुनाबाई तिरपुडे हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटरवर कारवाई करून ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
ठळक मुद्देउपद्रव शोध पथकाने केली कारवाई