नागपूर : शहरात तलावांवर गणपती विसर्जनावर निर्बंध घालण्यात आले आहेत. फुटाळा, सोनेगाव, गांधीसागर, सक्करदरा तलावांना नागपूर महापालिका प्रशासनाने बॅरीकेट लावले आहेत. पण या तलावाच्या परिसरांमध्ये कृत्रिम तलाव निर्माण करून गणपती विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दुपारी शहरातील विसर्जनाचा आढावा घेतला. तसेच शहरातील विविध भागात देखील विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण केले आहे.
महापालिका प्रशासनाचा उपक्रम शहरातील २०४ ठिकाणी तब्बल ३९० कृत्रिम तलाव साकारण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळपासूनच घरगुती गणपतींच्या विसर्जनाला सुरूवात झाली. तलावावर विसर्जनास निर्बंध घातल्याने अनेकांनी घराजवळील कृत्रिम तलावांवर विसर्जन केले. महापालिकेने कृत्रिम तलावाबरोबर मूर्ती स्वीकार केंद्रही सुरू केले आहे. ज्यांना विसर्जन करण्यासाठी तलावावर जाता येत नाही, अशा लोकांच्या घरी महापालिकेचे मूर्ती स्वीकार केंद्राची गाडी जावून मूर्तीचे विसर्जन करवून घेत आहे. शिवाय कृत्रिम तलावाजवळ निर्माल्य संकलनासाठी निर्माल्य कलश देखील ठेवण्यात आले आहे. या विसर्जन सोहळ्यात तलाव प्रदूषित होवू नये म्हणून महापालिकेची अख्खी यंत्रणा कामाला लागली आहे.