गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. याचा विचार करता महापालिकेने २०१४ मध्ये शहरातील विद्यमान पथदिवे बदलवून एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टप्प्यात १८ महिन्यात २७ हजारांचे उद्दिष्ट असताना जेमतेम ५३७ पथदिवे बदलविले. त्यामुळे जे.के. सोल्युशन इंक कंपनीचा कंत्राट रद्द करण्यात आला. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात नव्याने या कामाला सुरुवात करण्यात आली. मार्च २०१८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. डिसेंबरअखेरीस जेमतेम १४ हजार एलईडी दिवे लावण्यात आले. त्यामुळे १ लाख ३० हजार दिवे लावण्याला किती वर्षे लागतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.महापालिकेला दरवर्षी पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती तसेच वीज बिलावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. या खर्चासोबतच ऊर्जा बचत व्हावी, या हेतूने सोडियम दिव्याऐवजी एलईडी दिवे लावण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. या प्रकल्पांवर ४७० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यात नादुरुस्त केबल बदलणे, तुटलेल्या खांबांच्या ठिकाणी नवीन खांब बसविणे, फिडबॅक देणारे नवीन फिडर बसविणे आदी कामांचा समावेश आहे. यावर ५९ कोटींचा खर्च अपेक्षित असून, राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने यासाठी कर्ज घेण्याला महापालिकेला अनुमती दिलेली आहे. या प्रकल्पामुळे महापालिकेच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होण्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. पहिल्या टप्प्यात शहरालगतच्या भागात एलईडी दिवे लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानंतर शहरातील रस्त्यांवरील विद्यमान पथदिवे बदलवून त्याठिकाणी एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर काही वर्षांत प्रकल्पावरील खर्च निघून ३५० कोटींची बचत होईल, असे असूनही या प्रकल्पांला विलंब होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
झोननिहाय कंत्राट तरीही विलंब२०१४ मध्ये जे.के. सोल्युशन इंक कंपनीला निर्धारित कालावधीत एलईडी दिवे बसविण्यात अपयश आल्याने या कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले. या कंपनीचा अनुभव विचारात घेता झोननिहाय एलईडी दिवे बसविण्याचे वेगवेगळ्या कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. दिवे बदलविण्यासोबत जुने केबल बदलणे, जुने खांब बदलण्याच्या कामाचा समावेश आहे. परंतु झोननिहाय कामांचे कंत्राट दिल्यानंतरही कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही. त्यामुळे निर्धारित कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होईल, असे दिसत नाही.३५४ कोटींची बचत होण्याचा दावापथदिव्यांची जागा एलईडी दिवे घेणार असल्याने देखभाल व दुरुस्तीच्या खर्चात मोठी कपात अपेक्षित आहे. तसेच ६० ते ७० टक्के ऊर्जा बचत होणार असल्याने ९९ महिन्यात एलईडी दिवे लावल्यानंतर पुढील नऊ वर्षात प्रकल्पावरील संपूर्ण खर्चाची परतफेड होऊन ३५४ कोटींची बचत होणार असल्याचा दावा महापालिकेच्या विद्युत विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे.नियंत्रण कुणाचेएलईडी पथदिव्यांमुळे महापालिकेच्या खर्चात बचत होण्याचा दावा केला जात आहे. परंतु या कंत्राटदारांकडून खरेदी करण्यात आलेल्या एलईडी दिव्यांची किंमत व बाजारातील किंमत यात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचा विरोधी पक्षातील नगरसेवकांचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकल्पावर नियंत्रण कुणाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.