लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील डांबर रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली असता, केवळ काहीच खड्डे असल्याचा दावा करणाऱ्या नागपूर महानगरपालिकेचा आणखी एक अजब कारभार समोर आला आहे. २०१५-१६ या वर्षांतील खड्डे दुरुस्तीच्या ४२ कोटींच्या खर्चाचा हिशेबच मनपाकडे उपलब्ध नाही. यासंदर्भातील ‘रजिस्टर’च उपलब्ध नसल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली असून यामागे गैरप्रकार तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या ‘हॉट मिक्स प्लान्ट’ विभागात विचारणा केली होती.२०१५-१६ पासून खड्डे दुरुस्तीसाठी किती रुपयांची तरतूद करण्यात आली व प्रत्यक्षात यातील किती निधी खर्च झाला, तसेच मशीन व यंत्रसामुग्री खरेदीसाठी किती खर्च झाला, यासंदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. मनपाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, २०१५-१६ या वर्षात स्थायी समितीकडून ३० कोटी १४ लाख तसेच मनपा आयुक्तांकडून १२ कोटी ७९ लाख अशी एकूण ४२ कोटी ९३ लाख रुपयांची रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ही तरतूद खड्डे दुरुस्ती, किरकोळ खर्च, ‘हॉट मिक्स प्लान्ट’ दुरुस्ती, इंधन खरेदी, नवीन यंत्रसामुग्री खरेदी, डांबर खरेदी इत्यादी बाबींसाठी होती.मात्र यापैकी नेमका किती निधी खर्च करण्यात आला, याची कुठलीही माहिती विभागाकडे नाही. यासंदर्भातील ‘रजिस्टर’ उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात आले आहे. ही बाब नक्कीच बुचकळ्यात टाकणारी आहे.
रस्ते दुरुस्तीसाठी केवळ २२ टक्के निधी खर्च२०१५-१६ च्या खर्चाची विभागाकडे माहितीच नसताना, एप्रिल २०१६ ते जून २०१८ या कालावधीत एकूण तरतुदीपैकी केवळ २२ टक्के निधीचा रस्ते दुरुस्ती व इतर कामांसाठी खर्च करण्यात आला. या काळात ८४ कोटी ३९ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. यापैकी केवळ १९ कोटी १२ लाख ८ हजार रुपये खर्च करण्यात आले.