लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कचरा संकलनाबाबत नागरिकांच्या तक्रारी विचारात घेता, नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन लिमिटेडने स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन अधिक व्यापक व पारदर्शी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केरळच्या धर्तीवर क्युआर कोड पद्धतीवर आधारित ‘स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम’ कार्यान्वित केली आहे.
गांधीबाग झोनमध्ये या प्रकल्पाला शुक्रवारी सुरुवात करण्यात आली आहे. क्युआर कोडच्या माध्यमातून आता कुठल्या घरातून कचरा उचलण्यात आला अथवा नाही, याची इत्यंभूत माहिती मिळणार आहे. यामुळे कचरा संकलन व्यवस्था अधिक व्यापक आणि पारदर्शक होणार असल्याची माहिती नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी यावेळी दिली.
अधिकाऱ्यांना कळणार घर क्रमांक व नाव
कचरा संकलनाच्या तक्रारी दूर करण्यासाठी क्युआर कोडवर आधारित संकल्पना स्मार्ट प्रकल्प स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुरु करण्यात आला आहे. या प्रणालीच्या माध्यमातून कचरा संकलन केलेल्या घराचा क्रमांक, घरमालकाचे नाव अशी माहिती अधिकाऱ्यांना प्राप्त होणार आहे. या यंत्रणेमुळे शहरातील कचरा संकलन अधिक व्यापक आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे.
दहा घरांवर क्युआर कोड स्टिकर
गांधीबाग झोनमधील दहा घरांवर आय. टी. आय. कंपनीतर्फे क्युआर कोड स्टिकर लावण्यात आले आहेत. कचरा संकलन करणारा कर्मचारी आधी कोडवर आपल्या मोबाईलद्वारे स्कॅन करेल आणि वजन करून कचरा घेईल. या व्यवस्थेमुळे नागरिकांच्या घरातून ठराविक वेळेत कचरा उचलला जाईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास शहरात राबविला जाणार असल्याची माहिती ई गव्हर्नन्स विभागाचे महाव्यस्थापक डॉ. शील घुले यांनी दिली.