मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजा बढे हा नावाप्रमाणेच राजा-माणूस. रुबाबदार, प्रसन्न व्यक्तिमत्त्व, राजस छबी, कुसुमकोमल भावनांना शब्दबद्ध करणारा, कोमलवृत्तीचा प्रतिभासंपन्न कवी अशी त्यांची ओळख. परंतु अशा शब्दप्रभूच्या प्रतिभेला नागपूर महानगर पालिकेच्या अज्ञानाचे गालबोट लागले असून महापालिकेने त्यांचे नाव ज्या तुळशीबाग चौकाला दिले त्या चौकात उभारलेल्या त्यांच्या शिलेवर अशुद्ध आणि क्लिष्ट लेखनासोबतच संदर्भाच्याही अनेक अक्षम्य चुका करून ठेवल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते या चौकाचे उद्घाटन झाले. यावेळी उपस्थित साहित्यिकांनी शिलालेखातील चुका बघून खंत व्यक्त केली. चांदणे शिंपीत जाशी..., जय जय महाराष्ट्र माझा... अशा दर्जेदार काव्य रचना करणारे कविवर्य राजा बढे यांचा जन्म नागपुरात झाला. महाल परिसरात त्यांचा वाडा होता. राजा बढे यांच्या नावाने एखादे स्मारक अथवा त्यांचे नाव एखाद्या चौकाला देण्यात यावे, यासाठी विदर्भ साहित्य संघातर्फे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. महापालिकेने तुळशीबाग चौकाला राजा बढे यांचे नाव दिले. राजा बढे यांच्या गौरवात त्यांच्या नावाने एक भव्य शिला लावण्यात आली. परंतु या शिलेत त्यांच्या कार्याच्या गौरवात देण्यात आलेले संदर्भ चुकीचे आहेत. शिवाय व्याकरणाचाही अनेक चुका आहेत. या शिलालेखात राजा बढे यांच्यातील गुणांचा गौरव करताना त्यांना उत्कृष्ट नेलपेंटर असे लिहलेले आहे. नेलपेंटर या शब्दावरच जाणकारांचा आक्षेप आहे. त्याचबरोबर खरड चित्रकार असेही नोंदविले आहे. वैदर्भिय, खरया, राम राज्य, उत्तोत्तर, ख्रिस्थ-पूर्व, अस्या, कविश्रेप्ट, गाझली, हे शब्द राजा बढेंच्या शब्दप्रतिभेचा जणू अपमानच करीत आहेत. प्रकाश चित्रपट निर्मिती संस्था ही संस्था असताना शिलालेखात ‘प्रकाश चित्रपट’ निर्मिती संस्था असा उल्लेख केला आहे. वर्ष दर्शविण्यासाठी वापरण्यात आलेला सन हा शब्द ‘सण’ असा लिहिला आहे. दिल्लीला दिली तर रसिक प्रेक्षक लिहिताना ‘रसिका’ असे लिहिले आहे. ‘सण १९७७ साली राजधानी दिली येथे’ राजा बढे यांनी ‘राजगडचा राजबंधी’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. परंतु शिलालेखात मात्र ‘शिवाजी’ चित्रपटाचा संदर्भ आहे. चौकाच्या अनावरण कार्यक्रमाला वि.सा. संघाशी संबंधित मान्यवर, राजा बढे यांच्या वहिनी, बहीणसुद्धा उपस्थित होत्या. त्यांनी हा शिलालेख वाचून नाराजी व्यक्त केली. पण ऐकेल ती मनपा कसली?बघा हे मनपाचे अज्ञानशिलालेखात शेवटी राजा बढे यांच्या सुवर्ण रचना असे लिहिलेले आहे व त्याखाली पाच गाणी लिहिलेली आहेत. पहिलेच गीत चांदणे शिंपीत जावे... हे चुकीचे आहे. हसतेस अशी का मनी.. लता मंगेशकर यांनी गायलेले असे लिहिलेले आहे. सुजाण हो परिसा रामकथा.. यातून नेमका गीताचा बोध होत नाही आणि शेवटी गीत न लिहिता रामराज्य चित्रपटातील एक गाणे असे लिहून रचना पूर्ण केल्या आहेत.
राजा बढेंच्या लौकिकाला नागपूर मनपाचे गालबोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 10:56 AM
राजा बढे हा नावाप्रमाणेच राजा-माणूस. परंतु अशा शब्दप्रभूच्या प्रतिभेला अज्ञानाचे गालबोट लागले असून त्यांचे नाव ज्या तुळशीबाग चौकाला दिले त्यात उभारलेल्या शिलेवर अनेक अक्षम्य चुका महापालिकेने करून ठेवल्या आहेत.
ठळक मुद्देशिलालेखात चुकाच चुका अशुद्ध आणि क्लिष्ट लेखनासोबतच संदर्भांचीही ऐशीतैशी