लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजकीय पक्षांना एक हजार कोटी रुपयांचे निवडणूक रोखे देणाऱ्या मेघा इंजिनिअरिंग कंपनीची सहकारी कंपनी असलेल्या एन्वी ट्रान्स प्रा. लि. कंपनीवर नागपूर महापालिका मेहेरबान झाली आहे. या कंपनीला शहर बससेवेसाठी तब्बल १३०० कोटींचे कंत्राट देण्याची प्रक्रिया राबविली जात आहे.
विशेष म्हणजे कंत्राट प्रक्रियेत ही एकमेव कंपनी सहभागी आहे. ऐन निवडणुकीच्या आचारसंहितेत राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत महापालिकेकडून नियम धाब्यावर बसविल्याचा आरोप नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी केला. ही निविदा प्रक्रिया रद्द करून ती नियमांनुसार पुन्हा राबविण्याची मागणी त्यांनी केली.
दरवर्षी दरवाढ देण्याचा कट निविदा नियमांनुसार कंत्राटदाराला देण्यात येणारी दरवाढ ही बंधनकारक नसते, तरी या निविदाप्रक्रियेत कंत्राटदार कंपनीला दरवर्षी दरवाढ देण्याचा कट रचला गेला आहे. या माध्यमातून महापालिकेला दरवर्षी कोट्यवधींचा अतिरिक्त भुर्दंड बसेल आणि कंत्राटदार कंपनीला कोट्यवधी रुपयांचा लाभ पोहोचणार, अशी व्यवस्था करण्यात आली.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १६ मार्चपासून लागू झाली आहे, तरी महापालिकेने मतदानाच्या काही दिवसांपूर्वी या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ दिली, हीच कृती संशयास्पद आहे. सर्व नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेली निविदा प्रक्रिया रद्द करावी, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.