नागपूर : ७ डिसेंबरपासून सुरू होणार्या हिवाळी अधिवेशनात सोयी सुविधा पुरविण्याची जबाबदारी महानगरपालिकेवर आहे. त्यामुळे मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी अधिकार्यांकडे विविध जबाबदारी सोपविली आहे. त्यासंदर्भातील निर्देश त्यांनी पत्राद्वारे सर्व अधिकाऱ्यांना दिले आहे.
हिवाळी अधिवेशनादरम्यान दरवर्षी महानगरपालिकेतर्फे पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य, विद्युत, रस्त्यावरील खड्डे आणि अग्निशमन विषयक कामे पुरविली जातात. अधिवेशनासाठी येणारे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, कक्ष अधिकारी यांना कामकाजास्तव लागणारे झेरॉक्स मशीन, ऑपरेटर, सर्व प्रकारची स्टेशनरी व इतर साहित्य पुरविण्याची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश धामेचा यांच्याकडे दिली आहे. विधानभवन परिसराच्या आत व बाहेरील मुख्य रस्त्यांचे नियमित स्वच्छता ठेवणे, रविभवन, हैद्राबाद हाऊस, रामगिरी, नागभवन येथे स्वच्छता ठेवणे, कचरा डोअर टू डोअर उचलण्यास गाडी पाठविणे, विधानभवन, रविभवन, हैद्राबाद हाऊस परिसरात मोकाट जनावरांचा शिरकाव होणार नाही याची दक्षता घेणे, मोर्चा व गर्दीच्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट पुरविण्याची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यावर सोपविली आहे.
- रस्त्याचे खड्डे व दुरूस्तीची जबाबदारी हॉटमिक्स प्लांटवर
विधानभवन, रविभवन, रामगिरी, देवगिरी, हैद्राबाद हाऊस व १६० गाळा परिसरातील मुख्य रस्त्यांची दुरुस्ती करणे, खड्डे बुजविण्याचे काम हॉटमिक्स प्लांटचे कार्यकारी अभियंता अजय डहाके यांच्याकडे देण्यात आले आहे. रामगिरी, विधानभवन आणि राजभवन परिसरात २४ तास बंदोबस्तासाठी अग्निशमन वाहन तैनात ठेवण्याचे आदेश अग्निशमन अधिकारी भीमराव चंदनखेडे यांना देण्यात आले आहे.
विमानतळ ते विधानभवनपर्यंत मुख्य रस्त्यावरील रस्ते दुभाजक, फूटपाथची रंगरंगोटी करणे, दुरुस्तीची जबाबदारी वाहतूक विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र बुंधाडे यांच्यावर सोपविली आहे. अधिवेशन काळात बसेसची व्यवस्था करण्याची उपायुक्त सुरेश बगळे, शहरातील सर्व पथदिवे वेळेवर सुरु व बंद होण्यासाठी कार्यवाही करणे, सीसीटीव्ही सुरू ठेवण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता आर. यू. राठोड यांच्यावर तर पाणीपुरवठ्याची जबाबदारी अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जीवर सोपविण्यात आली आहे.