नागपूर : उपराजधानीत हिवाळा, पावसाळा व उन्हाळा ते तीनही ऋतू तीव्र असतात. गतकाळात जून-जुलैमध्ये नागपूरला पुराने वेढा घातल्याची उदाहरणे आहेत. शिवाय नागपूरचा बराचसा भाग खोलगट असल्यामुळे सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार दर पावसाळ्यात घडतात. अशा परिस्थितीत नागपूर महापालिकेची निवडणूक जून-जुलैमध्ये झाली व पावसाने जोर धरला तर ‘मतदान’च वाहून जाण्याची शक्यता आहे. पावसामुळे मतदानाची टक्केवारी घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागपुरात नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदीच्या काठावर अनेक वस्त्या आहेत. बऱ्याचदा या नदी नाल्यांच्या लगतच्या वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याच्या घटनाही घडल्या आहेत. नाग नदीमुळे मध्य व पूर्व नागपुरातील वस्त्यांना फटका बसतो. पिवळी नदीच्या पुरामुळे उत्तर नागपुरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरते. मोठ्या प्रमाणात सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने पहायला मिळते. दक्षिण नागपुरात सखल भागातील वस्त्यांची संख्या जास्त आहे. पावसाळ्यात या वस्त्यांना तलावाचे स्वरुप येते. मध्य नागपुरातील दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये तर तसेही पावसाळ्यात मार्ग काढणे कठीण जाते. त्यामुळे मतदानाच्या काळात जोराचा पाऊस झाला तर नागरिकांची तारांबळ उडून त्याच्या मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याचा धोका आहे.
- सिमेंट रस्त्यांमुळे पाणी साचते
शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते तयार झाले. मात्र, या रस्त्यांचे बांधकाम वस्त्यांतील रस्त्यांपेक्षा उंच झाले आहे. त्यामुळे सिमेंट रोडला पाणी अडून वस्त्यांमध्ये पाणी साचून राहते. अशावेळी साचलेले पाणी काढण्यासाठी नागरिकांचा नगरसेवक व प्रशासनावर रोष वाढतो.
मतदान केंद्रांवर गैरसोयीची शक्यता
- नागपुरात बहुतांश मतदान केंद्रे ही महापालिकेच्या किंवा खासगी शाळांमध्ये असतात. मात्र, महापालिकेच्या बहुतांश शाळांच्या परिसरात पाणी साचते. शिवाय या शाळांची मैदाने सिमेंट फ्लोरिंगची नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी जमा होऊन चिखल साचतो. काही शाळांमध्ये तर पावसाचे पाणी शिरते. त्यामुळे मतदान केंद्रावर गैरसोय होण्याची शक्यता आहे.
पावसाळी अधिवेशनाचा प्रयोग फसला
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जुलै २०१८ मध्ये नागपुरात पावसाळी अधिवेशन झाले होते. अधिवेशन सुरू होताच ७ जुलै रोजी नागपुरात मुसळधार पाऊस झाला व विधान भवनाच्या सर्व्हर रुममध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे तेथील वीजपुरवठा खंडित होऊन तांत्रिक यंत्रणा विस्कळीत झाली होती. यामुळे सरकारवर टीकाही झाली होती. हा अनुभव पाहता पावसाळ्यात निवडणूक घेणे जोखमीचे ठरू शकते.
प्रशासनावर दुहेरी ताण
- पावसाळ्यात अनेक फ्लॅट स्कीम व वसाहतींच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडतात. अग्नीशमन विभागाला मदतीसाठी शेकडो कॉल जातात. पाणी उपसण्यासाठी मोटरपंप कमी पडतात. प्रशसानाची तारांबळ उडते. निवडणुकीच्या काळात जोराचा पाऊस झाला तर मात्र आधीच निवडणूक तयारीत व्यस्त असलेल्या महापालिका प्रशासनावर दुहेरी ताण येण्याची शक्यता आहे.
६६ ठिकाणे, ८५ झोपडपट्ट्या, ४० वस्त्यांमध्ये साचते पाणी
महापालिका प्रशासनाने २०२१ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार नागपूर शहरात ६६ ठिकाणी पावसाचे पाणी साचते. याशिवाय ४० वस्त्या व ८५ झोपडपट्ट्यांमध्ये पुराचे पाणी शिरते. वसंतराव नाईक झोपडपट्टी, कुंभारटोली, सावित्रीबाई फुलेनगर, तकीया, टीव्ही टॉवर, मानकापूर, पिवळी नदी, हत्तीनाला या झोपडपट्ट्या तर दरवर्षीच प्रभावित होतात. शिवाय नागपुरात झोपडपट्ट्यामंध्ये मोठ्या प्रमाणात मतदार राहतो. नागपुरात चार दिवस कोकण, कोल्हापूरसारखा पाऊस कोसळला. या झोपडपट्ट्यांमध्ये पुराने थैमान घालण्याचा धोका आहे.
व्हेरायटी चौकात चालली होती बोट
- २०१३ च्या पावसाळ्यात रात्री दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे व्हेराटी चौकापासून ते महाराज बाग चौकापर्यंतचा रस्त्यावर माणूसभर पाणी साचले होते. व्हेरायटी चौकात अक्षरश: बोट चालवावी लागली होती.