नागपूर : नागपूर महापालिकेत नुसता भ्रष्टाचार सुरू आहे. स्टेशनरी घोटाळा, ओसीडब्ल्यूचा १०० कोटींचा घोटाळा आहे. याची चौकशी झाली पाहिजे. घोटाळा करणारे तुरुंगात जातील. येथील भ्रष्टाचार थांबावा यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी दिला.
बेसा पॉवर हाऊस येथे गुरुवारी आयोजित शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संजय राऊत बोलत होते. राऊत म्हणाले, नागपुरातील लोकांमुळे राज्यात अस्थैर्य निर्माण झाले आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकारणाचा विट आला आहे. इथल्या लोकांचे लक्ष मुंबई महापालिकेकडे लागले आहे. मात्र शिवसेनेच्या नेतृत्वात मागील ४५ वर्षांपासून मुंबई महापालिकेत सत्ता आहे व ती पुन्हा शिवसेनेकडेच राहणार.
नागपूरकरांनी मुंबईत प्रॉपर्टी जमविली असून, नागपूरला वाऱ्यावर सोडले आहे. नागपूर महापालिकेत पुढचा महापौर हा शिवसेनेचाच असेल. मनपातील सत्ता उलथविण्याची ताकद शिवसेनेत आहे, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी आ. दुष्यंत चतुर्वेदी, महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे, किशोर कुमेरिया, शहरप्रमुख नितीन तिवारी, दीपक कापसे, आदी उपस्थित होते.