- मंगेश व्यवहारे नागपूर - मालमत्ता कराच्या थकबाकीदारांविरुद्ध महापालिकेने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. लकडगंज झोनच्या पथकाने गुरुवारी १०९ भूखंडावर जप्तीची कारवाई केल्यांनतर शुक्रवारी ५४ भूखंडावर जप्तीची कारवाई केली. जप्त केलेल्या भूखंडावर २७ लाख १९ हजार २७६ रुपयांचा कर थकित होता.
भरतवाडा येथील शमा को-ऑप. हाऊसिंग सोसायटीच्या ३४ भूखंडावर १८ लाख ५० हजार ३७८ रुपये मालमत्ता कराचे थकित होते. तर जय गंगा माँ बिल्डर्स ॲण्ड लॅण्ड डेव्हलपर्स यांच्या २० भूखंडावर ८ लाख ६८ हजार ८९८ रुपयांचा कर थकित होता. या थकबाकीदारांना महापालिकेने राबविलेल्या अभय योजनेची माहिती दिल्यानंतरही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर लकडगंज झोनच्या पथकाने शुक्रवारी जप्तीची कारवाई करून जप्त केलेल्या भूखंडधारकांना ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कराची थकबाकी भरण्याचे आवाहन केले. महापालिकेने कराच्या वसूलीसाठी शनिवार आणि रविवारी कार्यालय सुरू ठेवले आहे. ही कारवाई सहा. आयुक्त गणेश राठोड यांच्या नेतृत्वात सहा. अधीक्षक रोशन अहिरे, कर निरीक्षक भूषण मोटघरे, मनिष तायवाडे, संतोष समुद्रे, अमित पाटील, लालप्पा खान, आशिष ठाकरे, राज साम्रतवार, चेतन बेहुनिया आदींकडून करण्यात आली.