लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. थकबाकीदारांच्या ६४५ मालमत्ता जप्त करून लिलावात काढल्या. ८८ मालमत्ता महापालिकेच्या नावाने करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागील काही वर्षांपासून थकबाकी असलेल्या ८,६९२ मालमत्तांवर वॉरंट बजावण्यात आले आहे. थकबाकी न भरल्यास या मालमत्ता जप्त करून लिलाव केला जाणार आहे.२०१८-१९ या वर्षात मालमत्ता कराचे ५०९ कोटींच्या वसुलीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. २३ जानेवारीपर्यंत १८८ कोटींची वसुली झाली आहे. मागील वर्षाचा विचार करता याच कालावधीत १३२ कोटींची वसुली झाली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा वसुली ५६ कोटींनी अधिक असली तरी यावर समाधान मानता येणार नाही. उद्दिष्ट गाठण्यासाठी थकबाकी वसुली मोहीम हाती घेतल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.१८८ कोटींच्या वसुलीत ६६ कोटींची जुनी वसुली आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणातील मालमत्ताधारकांकडे २४ कोटींची थकबाकी आहे. ४२ कोटींची प्रकरणे आयुक्तांकडे अपीलात आहेत. यावर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. पाच हजारापर्यंत थकबाकी असलेल्या १.६९ लाख मालमत्ताधारकांकडे ३१ कोटींची थकबाकी आहे. पाच ते २५ हजारापर्र्यंत थकबाकी असलेल्यांची संख्या ६२ हजार असून, त्यांच्याकडे ६३ कोटींची थकबाकी आहे. २५ ते ५० हजारापर्यंत कर थकीत असलेल्या ६,४३५ मालमत्ताधारकांकडे २२ कोटींची थकबाकी आहे. ५० हजार ते १ लाखापर्यंत थकबाकी असलेल्या १९७६ मालमत्ताधारकांकडे १३ कोटी थकीत आहे. एक लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या ११९६ मालमत्ताधारकांकडे २४ कोटींचा कर थकीत आहे.थकबाकी वसुलीसाठी सुरुवातीला नोटीस व वॉरंट बजावल्यानंतर ठराविक मुदतीत थकबाकी न भल्यास अशा थकबाकीदारांच्या विरोधात हुकूमनामा काढून चल व अचल संपत्तीचा जाहीर लिलाव केला जाणार असल्याची माहिती कुकरेजा यांनी दिली. गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत ४५ बोरवेलच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. शहरात जवळपास ३५० बोरवेल केल्या जाणार आहेत. एलवन दरानुसार काम करण्यास इच्छुक असलेल्या कंत्राटदारांना यात थेट संधी दिली जाणार आहे.२८०१ कोटींचे उद्दिष्ट गाठणार२०१८-१९ या वर्षाच्या अर्थसंकल्प २८०१ कोटींचा होता. ३१ मार्चपर्यंत अपेक्षित महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा होईल. गेल्या वर्षाच्या तुलनेत महसुलात वाढ झाली आहे. शासकीय अनुदानातही वाढ झालेली आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांची कामे करण्यात यश आल्याची माहिती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.८८ मालमत्ता मनपाच्या नावावर करणारथकबाकी न भरल्याने तीनदा लिलाव केल्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद न मिळालेल्या ८८ मालमत्ता आपल्या नावावर करण्याची प्रक्रिया मालमत्ता विभागाने सुरू केली आहे. स्थायी समितीच्या पुढील बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल. अशी माहिती कुकरेजा यांनी दिली.शासकीय कार्यालयाकडे ६३ कोटीशहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांकडे मालमत्ता कराची ६३ कोटींची थकबाकी आहे. वसुलीसाठी नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा मालमत्ता विभागाचा विचार आहे.