लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिटिझन्स फोरमने खड्डेमुक्त नागपूर अभियान सुरु करून शहरातील खराब रस्ते व खड्ड्यांचे फोटो पाठविण्याचे आवाहन नागपूरकरांना करण्यात आले आहे. सोशल मीडियावरील या आंदोलनाला नागपूरकरांनी प्रतिसाद देत १ हजार ५०० खड्ड्यांचे फोटो फोरमकडे पाठविले. यासंदर्भात नागपूर लाईव्ह सिटी अॅप व इतर माध्यमातून मनपाकडे तक्रारी दिल्या. परंतु खड्डे बुजविण्यात आले नाहीत. याच अभियानाचा एक भाग म्हणून नागपूरकरांनी खड्ड्यांभोवती दिवे लावून प्रशासनाचा निषेध नोंदवला.
झिंगाबाई टाकळी,कळमना व वाठोडा, हजारी पहाड व सुरेंद्रगड तर नरेंद्रनगर व खामला परिसरात प्रतिकात्मक स्वरुपात हे आंदोलन करण्यात आले.
२८ ऑक्टोबरपासून फोरमने खड्डेमुक्त नागपूर हे अभियान सुरु केले. सोशल मीडियावर खड्ड्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मनपाने खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली. मात्र संथ कारभारामुळे शहरातील खड्ड्यांची समस्या अजूनही कायम आहे. मनपाने शहरातील खड्ड्यांचे व खराब रस्त्यांचे तातडीने सर्वेक्षण करुन युद्धपातळीवर खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घ्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सिटीझन्स फोरमचे अमित बांदूरकर व अभिजित झा यांनी दिला आहे.