योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत भटक्या श्वानांची प्रचंड दहशत वाढली असून शहराच्या अनेक भागात तर रात्रीच्या वेळी जाणे फारच कठीण झाले आहे. एकीकडे श्वानांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना मनपाने मात्र श्वानदंशाच्या आकडेवारीचाच खेळ सुरू केला आहे. मनपाने स्वत:च्याच आकडेवारीत अवघ्या वर्षभरात हेराफेरी केली असून श्वानदंशांची संख्याच कमी दाखविण्याचा प्रताप केला आहे. त्यामुळे शहरात श्वानदंशाची नेमकी आकडेवारी किती असा प्रश्न उपस्थित झाला आहे. २०१७ व २०१८ मध्ये प्राप्त झालेल्या माहितीच्या अधिकाराच्या आकडेवारीतून मनपाची ही ‘पोलखोल’ झाली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी काही दिवसांअगोदर माहिती अधिकारांतर्गत मनपाकडे विचारणा केली होती. २०११ सालापासून किती नागरिकांना श्वानदंश झाला, किती नागरिकांचा यामुळे मृत्यू झाला, मनपाने किती श्वानांची नसबंदी केली इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. याअगोदर याचसंदर्भात त्यांनी २०१५ व २०१७ मध्येदेखील माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. मात्र मनपाने यंदा दिलेली आकडेवारी ही २०१५ व २०१७ च्या आकडेवारीपासून पूर्णत: वेगळी आहे. जुन्या आकडेवारीनुसार एप्रिल २०११ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत नागपुरातील ७२ हजार ८९२ नागरिकांना श्वानांनी दंश केला होता. मात्र माहिती अधिकारातील नवीन आकडेवारीनुसार नोव्हेंबर २०११ ते जुलै २०१८ या कालावधीत श्वानदंश झालेल्या नागरिकांची आकडेवारी ही अवघी ३१ हजार २५८ इतकी दाखविण्यात आली आहे. दिवसांचा कालावधी लक्षात घेता सप्टेंबर २०१७ नंतर जुलै २०१८ पर्यंत आकडेवारी वाढणे किंवा तेवढीच राहणे अपेक्षित होते. मात्र मनपाच्या आकडेवारीत चक्क ४१ हजार ६३४ नागरिकांची घट झाली आहे. ही टक्केवारी थोडीथोडकी नसून १३३ टक्के इतकी आहे. मनपाने नेमकी आकडेवारीतील गणित का बिघडविले व श्वानदंश झालेल्या नागरिकांची नेमकी संख्या किती असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
नेमकी खरी माहिती कोणती ?माहितीच्या अधिकाराअंतर्गत नेमकी व अचूक माहिती असणे अपेक्षित असते. मनपाच्या आरोग्य विभागाकडून एकाच कालावधीत संपूर्ण शहरात झालेल्या श्वानदंशाबाबत २०१७ व २०१८ मध्ये वेगवेगळी माहिती देण्यात येत असेल तर हा संभ्रम निर्माण करणारा प्रकार आहे. आता नेमकी खरी माहिती कोणती मानावी, असा प्रश्न अभय कोलारकर यांनी उपस्थित केला.