लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विभागीय चौकशीचा अनुकूल अहवाल देण्यासाठी १५ हजारांची लाच मागणाऱ्या महापालिकेच्या स्टेनोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने गुरुवारी दुपारी जेरबंद केले. मोरेश्वर उमाजी लिमजे असे आरोपीचे नाव आहे.तक्रार करणारी व्यक्ती अभियांत्रिकी सहायक असून, महापालिकेच्या अतिक्रमण विभागात कार्यरत असताना त्यांना विविध आरोपावरून २०१७ मध्ये निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर २० जून २०१८ ला ते पुन्हा स्थापत्य अभियांत्रिकी सहायक म्हणून महापालिकेच्या अतिक्रमण विभागात रुजू झाले. मात्र, त्यांच्याविरुद्धची विभागीय चौकशी एक वर्षापासून सुरूच होती. चौकशीत त्यांनी स्वत:ची बाजू योग्य पद्धतीने मांडूनही त्यांना मुद्दाम खोट्या आरोपात अडकवण्यासाठी विभागीय चौकशीचा ससेमिरा लावण्यात आल्याची त्यांची तक्रार होती. या चौकशीचा अहवाल अनुकूल देण्यासाठी स्टेनो लिमजे यांनी तक्रारकर्त्याला १५ हजाराची लाच मागितली होती. ती द्यायची नसल्याने त्यांनी एसीबीकडे लिमजेविरुद्ध तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने चौकशीची शहानिशा केल्यानंतर त्यात तथ्य आढळल्याने गुरुवारी कारवाईचा सापळा रचला. त्यानुसार, तक्रारदाराने लिमजेला लाचेची रक्कम देताच बाजूला घुटमळणाºया एसीबीच्या अधिकारी, कर्मचाºयाने लिमजेवर झडप घालून त्यांना जेरबंद केले. त्यांच्याविरुध्द सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. एसीबीचे अधीक्षक पी. आर. पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोनाली चौधरी, शुभांगी देशमुख, नायक लक्ष्मण परतेकी, नायक दीप्ती रेखा, शिशुपाल वानखेडे यांनी ही कामगिरी बजावली.निवृत्तीनंतरच्या सेवेचे फळ !लिमजे काही महिन्यांपूर्वी सेवेतून निवृत्त झाले. महापालिकेत मोठा मलिदा मिळत असल्याची माहिती असल्याने त्यांनी इकडून तिकडून लग्गेबाजी करून पुन्हा महापालिकेत स्टेनो म्हणून मानधनावर नोकरी मिळवली अन् खाबूगिरी सुरू केली. अखेर गुरुवारी एसीबीने त्यांना जेरबंद केले.
नागपूर महापालिकेचा स्टेनो एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:25 AM
विभागीय चौकशीचा अनुकूल अहवाल देण्यासाठी १५ हजारांची लाच मागणाऱ्या महापालिकेच्या स्टेनोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने गुरुवारी दुपारी जेरबंद केले. मोरेश्वर उमाजी लिमजे असे आरोपीचे नाव आहे.
ठळक मुद्देविभागीय चौकशीचा ससेमिरा : अनुकूल अहवालाचे आमिष : १५ हजारांची लाच मागितली