नागपूर महानगरपालिका निवडणूक; काँग्रेसच्या उमेदवारीसाठी तब्बल १० हजारांचे ‘डिपॉझिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2022 07:30 AM2022-02-23T07:30:00+5:302022-02-23T07:30:02+5:30

Nagpur News नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज जमा करताना सर्वसाधारण संवर्गातील इच्छुकांना तब्बल १० हजार रुपयांचे ‘डिपॉझिट’ शहर काँग्रेसकडे जमा करायचे आहे.

Nagpur Municipal Election; 'Deposit' of Rs 10,000 for Congress candidature | नागपूर महानगरपालिका निवडणूक; काँग्रेसच्या उमेदवारीसाठी तब्बल १० हजारांचे ‘डिपॉझिट’

नागपूर महानगरपालिका निवडणूक; काँग्रेसच्या उमेदवारीसाठी तब्बल १० हजारांचे ‘डिपॉझिट’

Next
ठळक मुद्देइच्छुकांमध्ये नाराजीगरिबांनी अर्ज करायचा नाही का?

कमलेश वानखेडे

नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांना अर्ज वितरणास सुरुवात केली आहे. अर्ज घेण्यासाठी ३०० रुपये तर मोजायचेच आहेत, पण अर्ज जमा करताना सर्वसाधारण संवर्गातील इच्छुकांना तब्बल १० हजार रुपयांचे ‘डिपॉझिट’ शहर काँग्रेसकडे जमा करायचे आहे. पक्षाकडे अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांकडूनच एवढी मोठी रक्कम घेतली जात असल्यामुळे कार्यकर्ते नाराजीचा सूर आळवू लागले आहेत. वॉर्डात राबणाऱ्या, आंदोलनात आघाडीवर असणाऱ्या गरीब कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरायचाच नाही का, असा सवाल सामान्य कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

मंगळवारी पहिल्याच दिवशी १४७ इच्छुकांनी देवडिया काँग्रेस भवनातून अर्ज घेतले. अर्ज वितरणासाठी विधानसभानिहाय ६ टेबल लावण्यात आले आहेत. भरलेला अर्ज देवडिया काँग्रेस भवनात जमा करायचे आहेत.

शहर काँग्रेस भरणार तिजोरी

- महापालिकेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असते. एका जागेसाठी ८ ते १० अर्ज येतात. याचा अंदाज घेतला तर शहर काँग्रेसकडे हजारावर अर्ज येण्याची शक्यता आहे. यातून शहर काँग्रेसच्या तिजोरीत एक कोटींहून अधिक रक्कम जमा होऊ शकते. पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांकडून एवढी मोठी रक्कम वसूल करून, शहर काँग्रेसची तिजोरी भरणे योग्य नाही, अशी नाराजी इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केली.

अध्यक्षांनी याची नोंद घ्यावी

- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तसेच महिला संवर्गासाठी अर्जासाठी ७,५०० रुपये ‘डिपॉझिट’ म्हणून जमा करायचे आहेत. मागासवर्गीय उमेदवारांसाठी ही रक्कम खूप जास्त होत असल्याची ओरड आहे.

- सक्षम महिला राजकारणात याव्या, म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के महिला आरक्षण लागू करण्यात आले. मात्र, इच्छुक महिला उमेदवारांकडून तब्बल ७,५०० रुपये शुल्क आकारणे म्हणजे, त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण करण्यासारखे आहे. या मुद्द्यांची शहर अध्यक्ष आ.विकास ठाकरे यांनी नोंद घ्यावी, अशी इच्छुकांची मागणी आहे.

नगरसेवकांवर अतिरिक्त भुर्दंड

- काँग्रेसचे २९ नगरसेवक विजयी झाले होते. आता या नगरसेवकांना पुन्हा लढण्यासाठी अर्ज करायचा असेल, तर त्यांना ‘डिपॉझिट’च्या रकमेसह अतिरिक्त ५ हजार रुपये जमा करायचे आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता असल्यामुळे आधीच काँग्रेस नगरसेवकांना खूप संघर्ष करावा लागला. विकासनिधी मिळाला नाही. अशात नगरसेवकांवर अर्ज भरण्यासाठी अतिरिक्त दंड लादू नये, अशी भावना एका ज्येष्ठ नगरसेवकाने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

Web Title: Nagpur Municipal Election; 'Deposit' of Rs 10,000 for Congress candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.