नागपूर : नवीन प्रभाग पद्धतीमुळे अगोदरच विद्यमान नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांत भाजपकडून तिकीट मिळावे यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कुठल्याही नगरसेवकाने आपले किंवा पॅनलचे तिकीट निश्चित समजूच नये व कुणीही अतिउत्साहात कुठलेही वक्तव्य देऊ नये, असा स्पष्ट संदेश संघटनेकडून देण्यात आला आहे.
निवडणुकीच्या तयारीसाठी पूर्व नागपुरात सर्व प्रभागांमध्ये बैठका सुरू आहेत. रविवारी सहा प्रभागांमध्ये बैठक झाली. क्वेटा कॉलनीतील पाटीदार शाळेत झालेल्या बैठकीत आ. कृष्णा खोपडे, पूर्व नागपूरचे संयोजक माजी आमदार अनिल सोले हे उपस्थित होते. भाजपात प्रत्येक कार्यकर्ता प्रमुख आहे. कार्यकर्त्यांना जनतेत जायचे आहे व संवाद साधत असताना काही गोष्टी विचारपूर्वकच बोलल्या पाहिजेत. काही लोकांना आपली उमेदवारी निश्चित असल्याचे वाटत असेल. परंतु, अद्यापपर्यंत कुणाचेही तिकीट निश्चित नाही व कोणतेही पॅनल अंतिम झालेले नाही. पक्ष संघटनाच अखेरचा निर्णय घेईल, असे यावेळी सोले यांनी स्पष्ट केले. सोले हे पूर्व नागपूरचे संयोजक असून, पक्ष संघटनेचा संदेश त्यांनी पदाधिकारी, नगरसेवकांना दिला आहे. त्यामुळे अनेक प्रस्थापितांमध्येदेखील चलबिचल सुरू झाली आहे.