लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या आपली बस सेवेतील डिझेलवरील २३७ बसपैकी ७० बस सीएनजीमध्ये परिवर्तित करण्यात आल्या आहेत. पुढील वर्षात उर्वरित १८७ बस सीएनजीमध्ये परिवर्तित करणे, १०० इलेक्ट्रिक बस सुरू करणे, वाठोडा येथे नवीन बस डेपोेची उभारणी, व ई- टॉयलेट यासह विविध योजनांचा समावेश असलेला परिवहन विभागाचा २०२०-२१ या वर्षात ३०४.१७ कोटी उत्पन्न व ३०४.०१ कोटी खर्च अपेक्षित असलेला अर्थसंकल्प परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी गुरुवारी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांना सादर केला.परिवहन व्यवस्थापक राजेश मोहिते यांनी ५ मार्चला २०-२१ या वर्षाचा २७३.४७ कोटी उत्पन्न व २७३.११ कोटी खर्च अपेक्षित असलेला अर्थसंकल्प सादर केला होता. बाल्या बोरकर यांनी यात ३०.७ कोटींची वाढ करून ३०४.१७ कोटींचा अर्थसंकल्प दिला. यात वाठोडा येथील १०.८० एकर जागेवर नवीन बस डेपो उभारण्यासाठी ५६.६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पुढील आर्थिक वर्षात यासाठी ३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. वाठोडा येथे चार्जिंग स्टेशन, वर्कशॉप व इलेक्ट्रिक बस पार्किंगची व्यवस्था राहणार आहे. बसस्थानकावर प्रवाशांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी वॉटर एटीएम लावण्यासाठी १ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. प्रवाशांना एक दिवसीय पास देण्यात येईल. ग्रामणी व शहरी भागातील बसथांबे निर्माण करण्यासाठी १ कोटीची तरतूद करण्यात आल्याची माहिती बाल्या बोरकर यांनी दिली.२६.९७ लाख शिल्लक गृहीत धरण्यात आली आहे. पुढील वर्षभरात परिवहन विभागाला बस तिकिटातून ८४ कोटींचा महसूल तर शासनाकडून ११८ कोटींचे अनुदान अपेक्षित आहे. बस आॅपरटेरला पुढील वर्षात १३४ कोटी देणे अपेक्षित आहे. अर्थसंकल्पात नमूद केल्यानुसार शहरात ३८४ बस धावत आहेत. पुढील वर्षात ४३६ बसेस चालविण्याचा संकल्प आहे. यात ९५ स्टॅन्डर्ड, १०० सीएनजी, १५० मिडी , ४५ मिनी बस व ६ इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे. इलेक्ट्रिक बससाठी २० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.भंगार बसचा ई-टॉयलेटसाठी वापरस्वच्छ भारत योजनेंतर्गत शहरातील प्रवाशांच्या सुविधेकरिता प्रमुख बसथांब्यालगत जुन्या भंगार बसेसमधून महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र ई-टॉयलेट निर्मिती विचाराधीन आहे. ई-टॉयलेट करिता दोन बस प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.ठळक बाबी
- शहरात ४३६ बस धावणार.
- १०० इलेक्ट्रिक बस सुरू करणार
- मोरभवन बळकटीकरणासाठी १.५५ कोटींची तरतूद.
- बसस्थानकावर वॉटर एटीएम लावणार.
- एकदिवसीय पास सुविधा देणार.
- पास वितरणासाठी स्वतंत्र कक्ष.
- ५०० बसथांबे निर्माण करणार.
- तिकीट चोरी उघडकीस आणणाऱ्यांना बक्षीस.
- मोरभवन येथे चौकशी कक्ष.