लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महापालिकेच्या परिवहन विभागाचा २०१९-२० या वर्षाचा २८१.९९ कोटींचा अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी बुधवारी परिवहन समिती सभापती जितेंद्र कुकडे यांच्याकडे सादर केला. पुढील वर्षात शहरात ४५ मिनी व ५ तेजस्विनी बस धावणार आहेत. तसेच बससोबत मेट्रो रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांना कॉमन मोबिलिटी कार्ड योजना सुरू केली जाणार आहे. परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी अर्थसंकल्पात या बाबींचा समावेश केला आहे. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.सुरुवातीची शिल्लक १४.८६ लाख धरून पुढील वर्षात अपेक्षित उत्पन्न २८१.९९ कोटी राहील. त्यातील २८१.८६ कोटी खर्च अपेक्षित आहे.अर्थसंकल्पात नमूद केल्यानुसार चालू आर्थिक वर्षात महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार महिलांसाठी इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या पाच मिडी तेजस्विनी बसेस, पर्यावरणपूरक धोरण राबविण्याच्या अनुषंगाने मनपाच्या ५० स्टॅन्डर्ड बसेसचे परिवर्तन बायो सीएनजीमध्ये करण्याचा महापालिकेचा मानस आहे. याशिवाय प्रतिबस ऑपरेटर १५ मिनी बसेस प्रमाणे एकूण तीन डिझेल बस ऑपरेटरकडून एकूण ४२ मिनी बस शहरबस सेवेत दाखल होणार आहेत. या मिनी बसेस शहरातील लहान मार्गांवर संचालित करून मेट्रो स्टेशन व बस स्थानकापर्यंत सेवा देणार आहेत. अर्थसंकल्पात बदल करण्याचे अधिकार समिती सदस्यांनी सभापतींना दिले.शहीद कुटुंबीय व दिव्यांगांना मोफत प्रवासचालू आर्थिक वर्षात परिवहन समितीतर्फे अनेक नवीन आणि महत्त्वाकांक्षी योजना अमलात आणण्यात येणार आहेत. यामध्ये लष्कर, निमलष्कर दल, पोलीस दलातील देशासाठी कर्तव्यावर तैनात असताना शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबातील शहिदांच्या वीर माता, वीर पत्नी, व मुलांसह दिव्यांग बांधव व त्यांच्या सोबतच्या साथीदाराला मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.‘कॉमन मोबिलिटी कार्ड’शहरात लवकरच मेट्रो धावणार आहे. त्यामुळे शहर बसेस व मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ‘कॉमन मोबिलिटी कार्ड’ देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत शहर बस व मेट्रो रेल्वेचा सलग वापर प्रवाशांना करता येईल. याशिवाय नव्याने कोराडी मंदिर जवळ २० हजार चौरस मीटर एक बस डेपो एनआयटी, एनएमआरडीए तर्फे विकसित करण्यात येणार आहेत.