ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 14 - नागपूर महानगरपालिकेची तिजोरी रिकामी असल्याचा दावा अनेकदा अधिकारी-नेत्यांकडून करण्यात येतो. कर्मचा-यांनादेखील याचा फटका बसताना दिसून येतो. मात्र असे असतानादेखील हारतुºयांवर खर्चात बचत करण्यासाठी मनपाने पुढाकार घेतलेला नाही. २०१३ सालापासून फुल व पुष्पगुच्छांवरच मनपातर्फे सव्वादोन लाख रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करण्यात आला आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत मनपाच्या जनसंपर्क विभागाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१३ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत पुष्पगुच्छ व हार यांच्यावर किती रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मनपाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार या कालावधीत २ लाख ४३ हजार ३८५ रुपयांचे हार व पुष्पगुच्छ खरेदी करण्यात आले.
अनेकदा मनपाचे काही समारंभ एकापाठोपाठ एक असे असतात. कार्यक्रमांना काही पाहुणे येत नाहीत व त्यांच्यासाठी आणलेले पुष्पगुच्छ वाया जातात. असे पुष्पगुच्छ दुसºया कार्यक्रमांत वापरल्या जाऊ शकतात. मात्र एका समारंभासाठी पुष्पगुच्छ आणल्यानंतर त्याचा परत वापर होत नाही, असे मनपानेच माहितीत स्पष्ट केले आहे.
एकही निविदा नाही
मनपातर्फे हार व पुष्पगुच्छांसाठी ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. यासाठी २०१३ व १४ मध्ये ३ वेळा निविदा सूचनादेखील प्रकाशित करण्यात आली होती. मात्र एकही निविदा प्राप्त न झाली नव्हती. मनपाच्या कंत्राटासाठी एकही निविदा प्राप्त न होणे ही आश्चर्याचीच बाब आहे. सध्या वार्षिक दर करारारावर पुष्पगुच्छ व हार पुरविण्यात येतात.
तुळशीचे रोप असताना हारतुरे कशाला ?
गेल्या काही काळापासून महापालिका कार्यक्रमात तुळशीचे रोपटे देवून सत्कार करण्याची परंपरा आहे. जर तुळशीचे रोप देण्यात येत आहे तर मग परत हारतुरे देऊन जनतेच्या निधीची उधळपट्टी का करायची असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुष्पगुच्छ व हारावरील खर्चाची आकडेवारी
वर्ष - खर्च
२०१३ - ६७,०२०
२०१४ - ९३,७९०
२०१५ - २७,१००
२०१६-१७ - ५५,४४५