लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून महापालिका विविध उपक्रम राबवित आहे. परंतु भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे. या संदर्भात महापालिकेच्या संबंधित विभागाला माहिती नव्हती. ‘लोकमत’ ने या संदर्भात वृत्त प्रकाशित करून भांडेवाडीचे वास्तव पुढे आणले. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने मे. हंजर बायोटेक एनर्जीला नोटीस बजावून खुलासा मागितला आहे.सध्या शहरातील १२०० मेट्रिक टन कचरा येथे आणला जातो. यातील २०० मेट्रिक टन कचऱ्यावर मे. हंजर बायटेक एनर्जी माध्यमातून प्रक्रिया केली जाते. परंतु सध्या प्रक्रिया न करताच कचरा साठविला जात आहे. याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच पेंच प्रकल्प व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी माहिती जाणून घेतली. प्रक्रिया बंद असल्याबाबत विचारणा करून करारानुसार नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी दिले.हंजरच्या कामकाजासंदर्भात तक्रारी आहेत. यापूर्वी कंपनीवर दोन कोटींचा दंडही आकारण्यात आल्याची माहिती आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिली. वीज बिल न भरल्याने प्रकल्प बंद असल्याची माहिती आहे. याबाबत कंपनीला खुलासा मागितला आहे. कंपनीचे काम व्यवस्थित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कंपनीवर कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला.प्रक्रि या बंद असल्याने भांडेवाडी येथे कचऱ्याचा ढीग लागलेला नाही. येथे भरपूर जागा आहे. महिनाभरात कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. यात ८०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल. यातून ११.५ मेगावॅट वीज निर्मिती होईल. या प्रकल्पामुळे कचऱ्याची समस्या मार्गी लागणार आहे. कचऱ्यापासून तयार होणाऱ्या खताबाबत फर्टिलायजर कार्पोरेशन आॅफ इंडिया यांच्याशी महापालिका व हंजर यांनी त्रिपक्षीय करार केला आहे. हंजरने काम बंद केल्यास निर्माण होणाऱ्या खताची विक्री करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कचरामुक्त शहराचा संकल्प आहे. बायोमायनिंगचाही प्रस्ताव आहे. लवकरच याचे चांगले परिणाम दिसतील असा विश्वास अश्विन मुदगल यांनी व्यक्त केला.करारानुसार कारवाई करूकचऱ्यावरील प्रक्रिया अचानक बंद ठेवणे चुकीचे आहे. हंजर कंपनीला महापालिकेकडून आवश्यक सहकार्य मिळत आहे. करारानुसार हंजरवर कारवाई केली जाईल. सोबतच एस्सेल कंपनीचा कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प लवकरच कार्यान्वित केला जाईल. यामुळे ८०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होईल.नंदा जिचकार, महापौरसहा महिन्यात कचऱ्यातून सुटकाभांडेवाडी येथील कचऱ्याची समस्या कायमस्वरुपी निकाली निघावी. यासाठी कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. महिनाभरात हा प्रकल्प सुरू होईल. तसेच बायोमायनिंगची निविदा प्रक्रिया सुरू आहे. दोन्ही प्रकल्प कार्यान्वित होतील. पुढील सहा महिन्यात पूर्व नागपुरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.संदीप जोशी , सत्तापक्षनेते महापालिकास्वच्छ भारत अभियान निव्वळ देखावास्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. परंतु स्वच्छता होताना दिसत नाही. स्वच्छ अभियान हा निव्वळ देखावा आहे. भांडेवाडी डम्पिंगयार्ड येथील कचरा प्रक्रिया दीड महिन्यापासून बंद आहे. परंतु महापालिकेला याची माहिती नाही. स्वच्छता सर्वेक्षणादरम्यान प्रकल्प सुरू होता. नंतर बंद करण्यात आला.तानाजी वनवे, विरोधीपक्षनेता महापालिकाआरक्षणाच्या विरोधात वापरभांडेवाडी येथील जमीन कंपोस्टखत निर्माण करण्यासाठी आरक्षित आहे. परंतु या जागेच्या मागील अनेक वर्षापासून डम्पिंगयार्ड म्हणून वापर केला जात आहे. दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे या भागातील नागरिक त्रस्त आहेत. वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. सर्वसामान्यांना आंदोलनासाठी प्रवृत्त केले जात आहे. महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.दुनेश्वर पेठे, गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस