अंकिता देशकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन दिवसापूर्वी ६७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार- २०१९ची घोषणा झाली. यात उत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून ‘बार्डो’ला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले. मात्र, हा चित्रपट नागपूरकर कलावंतांशी निगडित आहे, याची माहिती फार थोड्या जणांना आहे. या चित्रपटाची पटकथा, संवाद व गीत नागपुरातील गुणी अभिनेत्री, नाट्यदिग्दर्शक, नाट्यलेखिका डॉ. श्वेता पेंडसे हिने लिहिले आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटात तिने भूमिकाही साकारली आहे. याच चित्रपटातील ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी सावनी रवींद्र या गायिकेला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आणि हे गाणे श्वेता पेंडसे यांनीच लिहिले आहे.
डॉ. श्वेता पेंडसे यांनी चित्रपटाचे कथाकार व दिग्दर्शक भीमराव मुडे यांच्यासोबत चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. दहा वर्षापूर्वी मुंबईत स्थायिक झालेल्या श्वेताने लोकमतशी संवाद साधताना ‘नागपूर ही माझी जन्मभूमी आणि हीच माझी कर्मभूमी’ असल्याचे सांगितले. श्वेता यांनी शहरातच रसायनशास्त्रात डॉक्टरेट पूर्ण केले. या चित्रपटातील अनेक लोक नागपूरशी संबंधित असून, त्याचा अभिमान वाटतो. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याने उल्हासित झालो आहोत. हा कोण्या एका व्यक्तीचा नव्हे तर सामूहिक प्रयत्नांचा पुरस्कार असल्याची भावना श्वेता पेंडसे यांनी व्यक्त केली. ‘बार्डो’ हा पटकथा लिहिण्याचा दुसरा प्रयत्न आहे. यासोबतच विदर्भाची पार्श्वभूमी असलेले व उच्चारांचा समावेश असलेले गाणे लिहिण्याचा योग मी विदर्भातील असल्यामुळे आला. गीत लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता आणि त्याला रोहण-रोहण या अद्भुत संगीतकाराचा स्पर्श झाला आहे. या चित्रपटाला आम्ही आमच्या पोटच्या बाळासारखे साकारले आहे. हा चित्रपट आईन्स्टाईनच्या ‘थेअर ऑफ ड्रीम रिलेटिव्हिटी’ या संकल्पनेवर आधारित आहे. विज्ञान विषयातील माझा अभ्यास चित्रपटाची पटकथा लिहिण्यात लाभदायक ठरल्याचे त्यांनी सांगितले.
‘रान पेटलं’ या गाण्याची पार्श्वभूमी विदर्भाची आहे. त्यासाठी ठराविक लहेजा व भाषेची गरज होती. टीममधूनच हे गाणे कोणीतरी लिहावे, जेणेकरून जिव्हाळा व्यक्त होईल, अशी धारणा प्रत्येकाची होती. मी विदर्भाची असल्याने हे गाणे मला लिहिण्यास सांगितले गेले.
- डॉ. श्वेता पेंडसे, अभिनेत्री, गीतकार, पटकथाकार, संवादलेखिका
....................