अभय लांजेवार
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : ‘शकुंतला’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या ब्रिटिशकालीन नागपूर-नागभीड ब्रॉडगेजचे काम डिसेंबर २०२० ला धडाक्यात सुरू झाले. शकुंतलेस नागपूर ते नागभीड हे केवळ ११६ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल पाच-सहा तासांचा कालावधी लागत होता. अनेक वर्षांपासून सर्व स्तरातून रुंदीकरणाची मागणी झाली. केंद्र शासन, रेल्वेने हिरवी झेंडी दिली. काम सुरू झाले. परिसरातील विकासकामात रेल्वे हा महत्त्वाचा दुवा ठरणार होता. अशातच एका संस्थेने वन व वन्यजीवास धोका निर्माण होत असल्याची तक्रार केली. कागदपत्रांच्या कचाट्यात रेल्वेचे काम अडकले. काही महिन्यांपासून कुही-उमरेड-भिवापूर या रेल्वेमार्गाच्या कामांचा खोळंबा झाला आहे.
नागपूर-नागभीड नॅरोगेज रेल्वेची सुरुवात गोऱ्यांच्या शासन काळात सन १९१३ ला झाली. नागपूर येथून कुही, उमरेड, भिवापूर व नागभीड परिसरातील शेकडो गावांना जोडणारे स्वस्त साधन ही रेल्वे होती. केवळ १५ रुपयात उमरेड ते नागपूर असा गोरगरिबांचा प्रवास होता. सदर रेल्वे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्याची मागणी जोर धरू लागली. २५ नोव्हेंबरपासून शकुंतलाचा प्रवास थांबला. डिसेंबर २०२० ला रुंदीकरणाचे काम सुरू झाले.
महाराष्ट्र रेल्वे इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून काम सुरू झाले. सोबतच पी. व्यंकटा रमनाई इंजिनिअर्स कॉन्ट्रॅक्टर्स व मे. शेळके कन्स्ट्रक्शन या कंपन्यांना वेगवेगळ्या टप्प्यातील कामाचे कंत्राट सोपविले. जुने रेल्वे रूळ काढणे, खोदकाम, बांधकाम व वृक्षतोडही सुरू झाली. अशातच उमरेडच्या वाईल्ड लाईफ कन्झरवेशन अॅन्ड डेव्हलपमेंट सेंटर या संस्थेने अवैध वृक्षतोडीची तक्रार केली. तक्रारीनंतर प्रादेशिक वनविभाग आणि वन्यजीव यांच्यात आरोपांच्या फैरी झडल्या. कागदपत्रांच्या कचाट्यात हे प्रकरण अडकले. त्यानंतर कामाचा वेग मंदावला. या सर्व भानगडीनंतर आता काही महिन्यांपासून रेल्वेच्या विकासकामांचा हा काफिला अचानकपणे थांबला. संस्थेच्या तक्रारीमागेही वेगवेगळी कारणे समोर येत आहेत.
.....
विकासकामे खोळंबली...
उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्य, ताडोबा, गोसेखुर्द पर्यटनास तसेच व्यापार, उद्योगास ब्रॉडग्रेज रेल्वेमुळे भरभराटीचे दिवस आले असते. उमरेड खाण क्षेत्रालासुद्धा हा मार्ग जोडला गेला असता व कोळसा वाहतुकीसाठीही अतिशय सोयीस्कर झाले असते. आता रेल्वेचे काम थांबल्याने अजून किती वर्षे प्रतीक्षा करावी लागेल, असा सवाल नागरिकांचा आहे.
....
प्रादेशिक-वन्यजीव आमनेसामने
उमरेड-कऱ्हांडला-पवनी परिसरात अवैध बांधकामाची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. शिवाय, अभयारण्य (वन्यजीव), राजस्व विभाग, वनविभाग यांच्यात आपसी समन्वय नसल्याने बहुतांश ‘नकाशे’ योग्य नाहीत. तक्रारीनंतर प्रादेशिक आणि वन्यजीव यांच्यात जुंपली आहे. यातच संपूर्ण वेळ जात असल्याने अद्याप यावर मार्ग निघाला नाही. कक्ष क्रमांक १४३९ मधील सर्व्हे क्र.१ व २ ची नोंद गट ग्रामपंचायत कारगाव यांच्या नावाने तसेच हे संरक्षित वनखंड आहे. अशी दुतोंडी भूमिका वन्यजीव विभागाची दिसून येते. तसेच अभयारण्याचे क्षेत्रच या परिसरात येत नाही, असे प्रादेशिक विभागाचे म्हणणे आहे. विकासकामांचा वेग वाढावा यासाठी तातडीने मार्ग काढण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे.