- नरेश डोंगरे नागपूर - मध्य रेल्वेने नागपूर - शहडोल - नागपूर ही नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून एक दिवस धावणाऱ्या या रेल्वे विशेष सेवेचा श्रीगणेशा मंगळवार २९ ऑगस्टपासून होणार आहे.
नागपूर हे आरोग्य सेवेचे मोठे केंद्र असून मध्य प्रदेशाच्या तुलनेत नागपुरात मोठ्या प्रमाणात आणि चांगली आरोग्य सेवा मिळत असून येथे दररोज ठिकठिकाणचे हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. खासगी बस किंवा खासगी वाहनाने रुग्णांना येथे आणने आणि परत घेऊन जाणे मोठ्या खर्चाचे ठरत असल्याने ही मंडळी रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. त्यामुळे मध्य प्रदेशमधून नागपूरकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये तिकडच्या प्रवाशांची संख्या लक्षणिय असते. ते ध्यानात घेऊन मध्य रेल्वेने नागपूर - शहडोल - नागपूर ही विशेष साप्ताहिक रेल्वेगाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ०८२८७ क्रमांकाची शहडोल - नागपूर रेल्वेगाडी मंगळवारी २९ ऑगस्टला दुपारी १ वाजता तेथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी अर्थात बुधवारी पहाटे ४ वाजता नागपुरात पोहचेल.
शहडोल ते नागपूरच्या दरम्यान येणाऱ्या उमरिया, कटनी साऊथ, जबलपूर, शिवनी, छिंदवाडा आणि साैंसर येथे या रेल्वेगाडीचा थांबा राहिल. ३० ऑगस्टपासून सर्व बुकिंग केंद्रावरून आणि रेल्वेच्या वेबसाईटवरून या गाडीत रिझर्वेशन करण्याची सुविधा राहणार आहे. ही गाडी सुरू झाल्याने मध्यप्रदेश मधील प्रवाशांना चांगली सुविधा निर्माण झाली आहे.
सरासरी १२ तासांचा प्रवास११२०१ नागपूर - शहडोल एक्सप्रेस नागपूरहून ४ सप्टेंबर पासून प्रत्येक सोमवारी दुपारी ११.४५ वाजता प्रस्थान करेल आणि मध्यरात्री १२.२० वाजता ती शहडोल रेल्वे स्थानकात दाखल होईल. तर, शहडोल नागपूर एक्सप्रेस दर मंगळवारी पहाटे ५ वाजता शहडोल स्थानकातून निघेल आणि सायंकाळी ६.३० वाजता ही गाडी नागपुरात पोहचेल. या गाडीत एक एसी टू टियर, दोन एसी थ्री टियर, ११ स्लिपर क्लास आणि ६ सामान्य द्वितिय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन राहिल.