नागपूर : नागपुरात आज अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूर-अमरावती रोडवर बाजारगाव येथे ही कंपनी आहे. या कंपनीत सकाळी ९ वाजताच्या सुमारास स्फोट झाला असून या प्रकरणी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केला आहे. "नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात असून स्वतः IG, SP, जिल्हाधिकारी घटनास्थळी आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना ५ लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. त्याला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मान्यता दिली आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी 'एक्स'वर लिहिलेल्या पोस्टमध्ये दुर्घटनेविषयी माहिती देत म्हटलं आहे की, "नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात ६ महिलांसह ९ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे."
दरम्यान, या दुर्घटनेत तब्बल ९ कामगारांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
सोलार कंपनीच्या स्फोटातील मृतकांची नावे
१. युवराज किसनाजी चारोडे, बाजारगांव२.ओमेश्वर किसनलल मछिर्के, चाकडोह ३ मिता प्रमोद उईके, अंबाडा सोनक काटोल४. आरती निळकंठा सहारे, कामठी ५. श्वेताली दामोदर मारबते, कन्नमवार ग्राम, वर्धा ६. पुष्पा श्रीरामजी मानापुरे, शिराळा, अमरावती ७. भाग्यश्री सुधाकर लोणारे, भुज ब्रम्हपुरी ८. रुमीता विलास उईके, ढगा वर्धा ९. मोसम राजकुमार पटले, पांचगांव भंडारा.