लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील नागरिकांची सुविधा विचारात घेता,‘ना नफा ना तोटा’या धर्तीवर ‘आपली बस’ चालविण्याचा महापालिकेचा मानस असला तरी, सध्याची परिस्थिती विचारात घेता आपली बसचा तोटा कमी होण्याची शक्यता नाही. उलट बसेसची संख्या वाढल्यानंतर महापालिकेच्या तिजोरीवरील आर्थिक भार वाढणार आहे.शहर बससेवेची जबाबदारी चार आॅपरेटरवर सोपविण्यात आली आहे. यात तीन रेड बस आॅपरेटर एक ग्रीन बस आॅपरेटरचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांत रेड बस आॅपरेटरचे महापालिकेकडे २७.२२ कोटी रुपये थकबाक ी आहे. थकबाकीसाठी गेल्या गुरुवारी बस आॅपरेटरने अचानक संप पुकारला होता. शहरातील बसेस तीन तास ठप्प होत्या. काही वेळात महापालिका प्रशासनाने १.५० कोटी रु. देण्याची ग्वाही दिल्यानंतर बसेस सुरू झाल्या. परंतु यावर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही.अचानक बससेवा ठप्प पडल्याने हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. बस आॅपरेटर कंपन्यांपैकी हंसा आॅपरेटर कंपनीचे ९ कोटी ६७ लाख, ट्रॅव्हल टाइम कंपनीचे ९ कोटी तर आऱ के़ सिटीबस आॅपरेटरचे ९ कोटी ०५ लाख रुपये महापालिकेकडे थकीत आहेत़ यासाठी संपाचे हत्यार उगारले होते. गेल्या वर्षभरापासून महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. अशापरिस्थितीत दर महिन्याला पाच ते सात कोटींचा आर्थिक भार महापालिकेवर पडत आहे.करारानुसार तीन रेड बस आॅपरेटरला ४८७ बसेस चालवायच्या आहेत. सध्या शहरातील रस्त्यांवर ३७५ बसेस धावत आहेत, म्हणजेच अजूनही २५ टक्के बसेस कमी आहेत. सर्व बसेस सुरू होण्यासोबतच तोटाही वाढणार आहे. यामुळे दर महिन्याला महापालिकेला सात ते आठ कोटींचा बोजा सहन करावा लागणार आहे.नागपूर शहरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे. मेट्रोच्या सेवेला महापालिकेची बससेवा पूरक असली पाहिजे, तरच शहरातील नागरिक आपली बसमधून प्रवास करतील व शहरातील रस्त्यांवरील खासगी वाहनांची संख्या कमी होईल. आपली बस तिकिटापासून महापालिकेला मिळणाºया उत्पन्नाच्या तुलनेत खर्च दुप्पट आहे. शहर बससेवा चालविण्याची जबाबदारी असलेल्या नागपूर महानगर परिवहन लिमिटेड(एनएमपीएल)ने महापालिकेला १०८ कोटी व इस्रो खाते उघडण्यासाठी ५० कोटींचा निधी उपलब्ध करण्याची मागणी केली होती; परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने हा निधी मिळालेला नाही.बससेवा सक्षम करण्याचा प्रयत्नकोणत्याही शहरातील बससेवा नफ्यात नाही. परंतु होणारा तोटा कमी कसा करता येईल, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. मासिक खर्चात कपात केली आहे. उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत. बससेवा सक्षम करण्याचा प्रयत्न आहे.शिवाजी जगताप, परिवहन व्यवस्थापक महापालिका