नागपूर :नागपूर महापालिकेच्या कर निरीक्षकाला पाच हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. नेहरूनगर झोनमध्ये झालेल्या या कारवाईमुळे पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कर निरीक्षक फिरोजुद्दीन निसारुद्दीन काझी (४५) असे आरोपीचे नाव असून, तो नेहरूनगर झोनमध्ये तैनात होता.
वर्धा रोड येथील रहिवासी तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावावर प्लॉट आहे. या भूखंडावर ६१ हजार रुपये मालमत्ता कर आकारण्यात आला. तक्रारदाराने काझी यांची भेट घेऊन मालमत्ता कर आकारणीबाबत तक्रार केली. काझींनी मालमत्ता कर योग्य असल्याचे सांगितले. कर कमी करण्याच्या बदल्यात त्याने पाच हजार रुपये मागितले. लाच दिल्यावर मालमत्ता कर ३३ हजार रुपये इतका करू, असे आश्वासन त्याने दिले.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीचे अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली. एसीबीकडे तक्रार आल्यावर चौकशी केली असता याला दुजोरा मिळाला. काझीने मंगळवारी सायंकाळी तक्रारदाराला नेहरूनगर झोनमध्ये बोलावले. तेथे काझीने पैसे घेताच त्याला एसीबीने अटक केली. त्याच्या घराची आणि कार्यालयाची झडती घेण्यात आली. या कारवाईमुळे मनपा कर्मचारी व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.