लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अधिकाऱ्यांकडून पैसे खाण्याचे टेक्निक बरेचदा ते अॅण्टीकरप्शनमध्ये पकडल्यानंतर वाचायला मिळते. पण काही अधिकारी अतिशय हुशार असतात, पैसे घेताना कोण कधी कशी वाट लावेल, याची भीती त्यांना असते. त्यामुळे या हुशार अधिकाऱ्यांचा पैसे घेण्याचा ‘वे’ (मार्ग) सुद्धा अनोखा असतो. शिक्षण विभागातील एक अधिकारी अॅण्टी करप्शनच्या नाही, पण लोकमतच्या दृष्टीस आला आहे. परंतु त्या अधिकाऱ्याच्या पैसे घेण्याच्या अनोख्या शैलीची चर्चा अख्ख्या यंत्रणेत आहे.शिक्षणासारखे पवित्र माध्यम आज भ्रष्टाचाराने बरबटले आहे, हे उघडपणे बोलले जाते. परंतु देणाऱ्याचेही काम होत असल्याने तक्रारींच्या भानगडीत कुणी पडत नाही. देणाऱ्यालाच नाही, तर घेणाऱ्याला काय अडचण. मात्र यातून चुकीच्या प्रकाराला, नियमबाह्य कामाला बळ मिळते. कुणी तक्रार करीत नसल्यामुळे वरिष्ठ अॅक्शन घ्यायला तयार नसतात आणि एकाच माळेचे सर्व मणी असल्याने एकमेकाच्या मागे कुणी लागत नाही. पण गेल्या काही वर्षामध्ये अॅण्टीकरप्शनची भीती अधिकाऱ्यांमध्ये आहे. आपण दूर राहूनच काम करायचे अशी भूमिका अधिकाºयांनी घेतली आहे. त्यातून पैसे घेण्याचे वेगवेगळे ‘वे’ पुढे आले आहे.सिव्हील लाईन परिसरातील विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात शिक्षण विभागातील एक अधिकारी अशाच वेगळ्या ‘वे’ ने पैसे घेताना लोकमतच्या दृष्टीस पडला. हे फार क्षणात झाल्याने त्याचे चित्रण करता आले नाही. पण प्रशासकीय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले असेल तर नक्कीच ही बाब पुढे येऊ शकते.
अशी घडली घटनाविभागीय आयुक्त कार्यालय परिसरात एका अधिकाऱ्याच्या चालकाने पार्क केलेली गाडी काढली. लगेच संबंधित अधिकारी गाडीच्या ड्रायव्हरच्या बाजूला बसले. चालक गाडी बाजूला पार्क करून गाडीच्या बाहेर उभा राहिला. अचानक एक संस्थाचालक आला. त्याने गाडीचा मागचा दरवाजा उघडला. खिशातून रक्कम काढली. गाडीत टाकली. गाडीचे मागचे दार बंद केले. पुन्हा सामोरचे दार उघडले. अधिकाऱ्याशी हस्तांदोलन केले. आणखी काही सेवा अशी विचारणा केली. अधिकारी पुढे निघाले आणि संस्थाचालकानेही परतीचा मार्ग धरला.