लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेयो व मेडिकलच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमधील १२०० खाटांवर १०१५ रुग्ण उपचार घेत असून के वळ १८५ खाटा शिल्लक आहेत. हे दोन्ही रुग्णालय मिळून नॉनकोविडचा १८५० खाटांवर १०५० रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या ८०० खाटा रिकाम्या आहेत. परंतु मनुष्यबळाची मोठी वानवा असल्याने, आहे त्याच रुग्णांना सेवा देण्यास दोन्ही रुग्णालयांना अडचणीचे जात आहे. शासनाने तातडीने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
मेयो, मेडिकलमध्ये विदर्भासोबतच आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. विशेषत: गरीब व सामान्य रुग्णांसाठी हे दोन्ही रुग्णालय आशेचे किरण ठरले आहे. परंतु शासनाने वेळोवेळी येथील रिक्त पदे भरली नसल्याने कोरोना प्रादुर्भावाच्या या काळात मोठ्या अडचणीला रुग्णालय प्रशासनाला तोंड द्यावे लागत आहे. यातच गेल्या तीन महिन्यांपासून ६००-६०० खाटांचे कोविड हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ लागत आहे. यामुळे नॉन क्लिनीकलच्या डॉक्टरांचीही ड्युटी रुग्णसेवेत लावण्याची वेळ आली आहे.मेडिकलमध्ये कोविडचा केवळ ६५ खाटा उपलब्धमेडिकलमध्ये रविवारी कोरोनाचे ४८० तर सारीचे ५५ असे एकूण ५३५ रुग्ण उपचाराला होते. कोविड हॉस्पिटलमध्ये खाटांची संख्या ६०० असल्याने ६५ खाटा शिल्लक होत्या. विशेष म्हणजे, महानगरपालिका खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये १३०० खाटा सांगत असलीतरी या खाटांचा खर्च गरीब व सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. यातच कोरोनाबाधितांची संख्या रोज १५०० ते २००० हजारावर जात आहे. यामुळे प्रशासनाला नव्याने विचार करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.मेयोमध्ये कोविडच्या १२० खाटा शिल्लकमेयोमधील ६०० खाटांच्या कोविड हॉस्पिटलमध्ये सारीच्या रुग्णांसह ४८० रुग्ण उपचाराला आहेत. सध्या १२० खाटा शिल्लक आहेत. मेडिकलच्या तुलनेत शिल्लक खाटा जास्त असल्यातरी कोविड हॉस्पिटलध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टरांना, परिचारिकांना सात दिवस रुग्णसेवा सात दिवस सुटी आणि लागण झाल्यास १४ दिवसासाठी क्वारंटाईन व्हावे लागत असल्याने मनुष्यबळाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.मेयोला हवे आणखी १२६ डॉक्टरमेयोच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये २८८ डॉक्टरांची गरज असताना केवळ ७० डॉक्टर कार्यरत आहेत. परिचारिकांसह तंत्रज्ञ, कक्षसेवक आदींचीही मोठी तफावत आहे.