लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे गोवारी समाजाचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे त्याचा फटका शहरातील वाहतूक व्यवस्थेला बसला. दुपारपासून सुरू झालेली वाहतुकीची कोंडी रात्री उशीरापर्यंत कायम होती. विशेषत: सिताबर्डी, धंतोली, रामदासपेठ, सदर, रेल्वेस्थानक मार्ग येथे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. शहराचे ‘हार्ट’च ‘ब्लॉक’ झाल्यामुळे नागरिकांना नाहक मन:स्तापाचा सामना करावा लागला. दुर्दैवाची बाब म्हणजे यात पोलीस प्रशासनाचे नियोजन पूर्णत: फसल्याचे दिसून आले. या ब्लॉकमध्ये अनेक स्कूलबस, रुग्णवाहिका बराच वेळ फसल्या होत्या. बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांनादेखील मोठा फटका बसला.
सिताबर्डीत दुपारी एक वाजल्यापासून आंदोलक संविधान चौक व व्हेरायटी चौकात ठाण मांडून बसले. त्यामुळे संविधान चौक, व्हेरायटी चौकाकडे जाणाऱ्या चारही मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सदर व कामठी रोडपासून सीताबर्डी व रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कामठी रोड ते एलआयसी चौकापर्यंत उडाण पुलावर उतरण्याचे काम सुरू झाल्यामुळे नायडू हॉस्पिटलजवळील रस्ता बंद आहे. अशा स्थितीत रेल्वे स्थानक आणि सीताबर्डीकडे जाणारे वाहनचालक मोहननगरच्या अंतर्गत रस्त्यावरून प्रवास करत होते. मात्र सेंट्रल ॲव्हेन्यू, रेल्वे स्टेशन आणि कस्तुरचंद पार्ककडून सदर आणि कामठी रोडच्या दिशेने येणारे वाहनचालकही अंतर्गत रस्त्याचा वापर करत आहेत.
या स्थितीत टेंट लाईनच्या आधीच छोट्या रस्त्यावर तासनतास वाहतूक कोंडी झाली होती. यासह सदर माउंट रोड, सदरच्या मेश्राम चौक ते रेसिडेन्सी रोड, लिबर्टी चौक या भागात वाहनांची कोंडी झाली होती. अनेक वाहनचालकांना सिव्हिल लाइन्सच्या अंतर्गत मार्गांचा वापर करून वर्धा रोड आणि अमरावती रोड गाठण्यावर भर दिला. दुसरीकडे आकाशवाणी चौक ते महाराजबाग चौक, कॉटन मार्केट चौक ते मानस चौक, झिरो माईल पॉइंट ते टेकडी रोड, विधानभवन चौक ते बोर्ड ऑफिस चौक, झाशी राणी चौक ते मुंजे चौक आणि व्हेरायटी चौक ते महाराजबाग रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
रुग्ण, विद्यार्थ्यांचे अतोनात हालनेमके कार्यालय व शाळा सुटण्याच्या वेळीच शहरातील केंद्रस्थान ‘ब्लॉक’ झाले होते. यामुळे अनेक स्कूलबस अडकल्या होत्या. तहानभुकेने विद्यार्थी व्याकूळ झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे सिताबर्डी, धंतोली, रामदासपेठ या परिसरात मोठ्या प्रमाणावर दवाखाने आहेत. मात्र येथील जवळपास प्रत्येकच रस्ता कोंडीमय झाल्याने अनेक रुग्णवाहिका अडकल्या. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना खूप त्रास सहन करावा लागला.
प्रवासी स्टेशनच्या दिशेने पायी निघालेकामठी रोड, सदर रोड आणि रेल्वे स्टेशन रोडवर वाहतूक कोंडीमुळे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. त्याला रेल्वेगाडी चुकण्याची भीती होती. काही प्रवासी वाहनांमधून उतरून पायीच रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघाले. बाहेरगावी जाणाऱ्या अनेक बसेसदेखील अडकल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या थांब्यांवर दोन तासाहून अधिक काळ प्रतिक्षा करावी लागली.
आपली बसदेखील अडकल्या, चाकरमान्यांना फटकासायंकाळच्या सुमारास कार्यालये सुटल्यावर अनेक चाकरमानी आपली बस किंवा शेअर ऑटोच्या माध्यमातून घर गाठतात. मात्र मोरभवन व इतर बसथांब्यांवरून बसेस निघणेदेखील अशक्य झाले होते. यामुळे अनेकांना घरी जाण्यासाठी साधनच मिळत नव्हते. नाईलाजाने त्यांना घराच्या दिशेने पायी किंवा परिचिताच्या वाहनावर लिफ्ट मागत जावे लागले.