लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नैसर्गिक आपत्तीशी महाराष्ट्र सध्या झुंजत असून, नागपूर जिल्ह्यातील लाईफ सेव्हर कोर्सचा पॅटर्न राज्यभरात राबविण्यात येईल, असे प्रतिपादन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी केले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जेडी स्पोर्ट्स फाऊंडेशनद्वारा आयोजित जेडी लाईफ सेव्हर कोर्सच्या ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जिल्हाधिकारी विमला आर., मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., निवृत्त क्रीडा सहसंचालक तथा जेडी स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश दुबळे, महासचिव जयंत दुबळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यावेळी उपस्थित होते. या आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत सध्या १०० युवकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. स्वयंसेवेची आवड असणाऱ्या अशा युवकांची संख्या एक हजारापर्यंत वाढवून त्यांना जीवरक्षक म्हणून प्रशिक्षित करता येईल. संकटकाळात पूरपरिस्थितीत व रस्त्यावरील भीषण अपघातात बचावकार्य कसे करावे, याबाबत दिले जाणारे प्रशिक्षण हे उपयुक्त ठरणार आहे. आलेल्या आपत्तीला तोंड देण्यासाठी समाजाने, नागरिकांनीदेखील दायित्व घ्यावे. भीषण आपत्तीत जीव वाचविणे हीच प्राथमिकता असली पाहिजे, असे विभागीय आयुक्त लवंगारे यांनी सांगितले.