लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही दिवसापासून नागपुरात सुरू असलेल्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या २७ व्या ऑरेंजसिटी क्राफ्ट मेळाव्याने नागपूरला हस्तकला, लोककला आणि लोकगीत-संगीताच्या रंगात रंगवून सोडले. या मेळाव्याचा समारोपही तशाच रंगतदार शैलीत झाला.दरवर्षीप्रमाणे आयोजित हा मेळावा देशभरातील कलावंतांच्या संगतीने पार पडला. समारोपाला हस्तशिल्पी कलावंतांना पुरस्कृतही करण्यात आले. त्यात हॅण्डलूम ज्वेलरीसाठी हैदराबाद येथील मामराज धुवालिया व भूज येथील वंकर पूजन अर्जन यांना प्रथम, हॅण्डलूम आर्टमटेरियलसाठी उत्तराखंडचे सोनू पाल व प. बंगालचे अभिजित खाटुआ यांना द्वितीय तर ड्राय फ्लॉवर आर्ट व पोट्रीकरिता नवीन दिल्लीचे संजय कुमार, प. बंगालचे अनुप भौमिक व उत्तर प्रदेशचे आबिद हुसैन यांना तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर इस्लाम अहमद यांना प्रोत्साहन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या मेळाव्यात देशभरातून १५० शिल्पकार सहभागी झाले होते. त्यातील ५० कलावंत राष्ट्रीय व राज्य पुरस्कारप्राप्त होते. मेळाव्यात हस्तशिल्पांसोबतच मनोरंनात्मक कार्यक्रमांची धूम होती. परिसरात असलेल्या खुल्या रंगमंचावर वेगवेगळ्या प्रांतातील लोकनृत्य व लोकसंगीताची मेजवानी नागपूरकरांना घेता आली. यात ढोलचोलम (मणिपुर), गौर माडिया (छत्तीसगड), पूर्वान्तिके लोक नृत्य (कर्नाटक), संगराई मोंग (त्रिपुरा), बोनालु नृत्य (तेलंगणा), सबलपुरी नृत्य (ओडिशा), बरदोई शिखला (असम), सिद्धी धमाल (गुजरात) आदी आदिवासी लोकनृत्यांचा आनंद नागपूरकरांनी घेतला. हरियाणा येथील नगाडा वादन आणि राजस्थानचे बहुरुपे आकर्षणाचे केंद्र ठरले. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन केंद्राचे कार्यक्रम अधिकारी दीपक कुळकर्णी व दीपक पाटील यांनी केले. यासोबतच ‘मुझमें भी कलाकार’ व्यासपीठावर २१५ कलावंतांनी सहभाग घेत आपल्या अंगभूत कलांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे संचालन मोहम्मद सलीम यांनी केले. केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर यांनी आभार मानले.
आदिवासी कला आणि लोकसंगीतात रंगले नागपूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 12:02 AM
गेल्या काही दिवसापासून नागपुरात सुरू असलेल्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या २७ व्या ऑरेंजसिटी क्राफ्ट मेळाव्याने नागपूरला हस्तकला, लोककला आणि लोकगीत-संगीताच्या रंगात रंगवून सोडले.
ठळक मुद्दे दमक्षेच्या ऑरेंजसिटी क्राफ्ट मेळाव्यात बहुसंस्कृतीचा मिलाफ हस्तशिल्पी कारागिरांना पुरस्कार प्रदान