नागपूर : फटाक्यांमुळे होणारे वायूप्रदुषण व ध्वनीप्रदुषण लक्षात घेता नागपूरपोलिसांनी फटाक्यांसंदर्भात निर्देश जारी केले आहेत. यानुसार आवाज तसेच प्रदुषण करणारे फटाके, लडी उडविण्यावर बंदी टाकण्यात आली आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सहपोलीस आयुक्त अश्वती दोर्जे यांनी हे निर्देश जारी केले आहेत. दिवाळीच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात लोक फटाके फोडतात. त्यामुळे अनेकदा लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. तसेच शांततेचादेखील भंग होतो. शहरात अनेक पेट्रोल पंप, गॅस सिलेंडर गोडावून, केरोसिन तेलाचे डेपो, ज्वालाग्राही पदार्थांचे डेपो, रासायनिक पदार्थांचे डेपो व दुकाने वस्ती किंवा बाजारपेठांमध्ये आहेत. फटाके किंवा रॉकेट फोडल्यास त्यामुळे आग लागण्याचा धोका असतो. त्यामुळेच पेट्रोल पंप, गॅस सिलेंडर, ज्वालाग्राही पदार्थ व केरोसिनचे गोडावून, फटाक्याची दुकाने यांच्यापासून २०० फुटांच्या अंतरात फटाके उडविण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच शाळा, काॅलेज, रूग्णालय, न्यायालय इत्यादी शांतात झोनच्या ठिकाणीदेखील १०० मीटर परिसरात फटाके फोडण्यास मनाई आहे.
उडणाऱ्या दिव्यांना बंदी
दिवाळीच्या काळात अनेक अतिउत्साही लोक उडणारे दिवे किंवा कंदील उडवतात. विशेषत: विमानतळाच्या परिसरात यामुळे धोका उद्भवतो. तसेच हे दिवे घरांवर पडून आग लागण्याचा धोका असतो. त्यामुळे असे दिवे व कंदील उडविण्यास मनाई करण्यात आली आहे. १० नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत हे निर्देश लागू असतील.