नागपूर : शहरातील विविध चौकांमध्ये वाहनचालकांकडून, तसेच समारंभांमध्ये आयोजकांकडून अक्षरश: पैसे वसूल करणाऱ्या तृतीयपंथीयांना यापुढे हा प्रकार महागात पडणार आहे. त्यांच्या विरोधात कारवाईचे पोलिस आयुक्तांनी निर्देश तर दिलेच होते. मात्र आता असा प्रकार झाल्यास थेट तडीपार करण्यात यावे, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे. सोमवारी तृतीयपंथीयांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.
लग्नात पैसे मागून गुजराण होते. त्यांच्याकडे रोजगाराचे कोणतेही साधन नाही. शहरात दीडशेहून अधिक तृतीयपंथी आहेत. त्यांच्यावर उपासमारीने मरण्याची वेळ आली आहे. इतर कोणत्याही शहरात असे निर्बंध नाहीत, अशी भूमिका तृतीयपंथीयांनी पोलिस आयुक्तांसमोर मांडली. लग्नात किंवा चौकाचौकांत पैसे मागणे म्हणजे एकप्रकारे खंडणीच आहे. हे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.
शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीचे ७० तृतीयपंथी असून त्यांची पूर्ण माहिती पोलिसांकडे आहे. त्यांच्यावर तडीपारी किंवा अन्य प्रतिबंधात्मक कारवाई होऊ शकते, असेदेखील त्यांनी सांगितले. तृतीयपंथीयांना रोजगार देण्याचे आश्वासन देत सर्वांच्या शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे सादर करण्यास त्यांनी सांगितले. उद्योजक आणि खासगी कंपन्यांशी चर्चा करून पोलिस प्रत्येकाला त्यांच्या पात्रतेनुसार रोजगार मिळावा यासाठी पाऊल उचलतील. एखाद्याने स्वत:हून तृतीयपंथीयांना लग्नाचे आमंत्रण दिले तर पोलिसांना त्याची काहीच अडचण राहणार नाही, असेदेखील पोलिस आयुक्तांनी सांगितले.
शहरात अनेक ठिकाणी तृतीयपंथीयांनी उच्छाद घातला आहे. वाहतूक सिग्नल्सवर ते पैसे मागतात व वाहनचालकांनी ऐकले नाही तर अगदी अश्लील वर्तनदेखील केले जाते. याशिवाय लग्न, स्नेहसंमेलन, धार्मिक कार्यक्रम, जन्म सोहळा किंवा मृत्यूप्रसंगीदेखील तृतीयपंथी गटाने पोहोचतात व पैशांची मागणी करतात. त्यांच्या या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. याबाबत अनेकांनी पोलिसांकडे दाद मागितली. मात्र ठोस कारवाई झाली नव्हती. यासंदर्भात अखेर निर्देश जारी झाले आहेत. पैसे मागण्यासाठी एकटे किंवा गटाने फिरल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच एखाद्या कार्यक्रमस्थळी निमंत्रणाशिवाय पोहोचल्यासदेखील कारवाई होईल. शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत.