लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी संपूर्ण शहर लॉकडाऊन आहे. सर्वच आपापल्या घरी आहेत. परंतु काही उपद्रवी रिकामटेकडे अजूनही कोरोनाला गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. ते विनाकारण रस्त्यावर येतात. धुडगूस घालतात. या प्रकारामुळे शासन-प्रशासनासह नागरिकांकडून घेतले जात असलेले प्रयत्न वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे अशा रिकामटेकड्यांविरुद्ध कठोर कारवाई करीत त्यांना हाकलून लावणे आणि जे खरच गरजू आहेत, कामनिमित्त बाहेर पडले आहेत, उपाशी आहेत, अशांसोबत संवेदनशीलतेचा परिचय देत त्यांना मदत करणे, अशा दुहेरी आघाड्यांवर सध्या नागपूर पोलीस लढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय हे स्वत: हातात दंडा घेऊन मैदानात उतरले आहेत, हे विशेष.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. नागपुरातही लॉकडाऊनचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा तैनात आहे. डोळ्यात तेल घालून ते आपली जबाबदारी निभावत आहेत. नागरिकांकडूनही पोलिसांना चांगली साथ मिळत आहे. परंतु काही रिकामटेकडे व उपद्रवी लोक रस्त्यावर येण्याचे प्रकार सुरू आहेत. अशा लोकांविरुद्ध पोलीस कठोरपणे कारवाई करीत आहेत. मात्र यापुढेही जाऊन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय हे स्वत: नागरिकांना वारंवार आवाहन करीत आहेत. मोमीनपुरा भागात असाच प्रकार आढळून आल्याने रविवारी पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी मोमीनपुरा परिसरात जाऊन एका धर्मगुरुंच्या माध्यमातून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. कोरोना विषाणूचा संसर्ग किती भयावह आहे, ही बाब लोकांना समजावून सांगितली. यापूर्वीही त्यांनी तसा प्रयत्न केला होता. त्याचे परिणामही दिसून आलेत. मुस्लीम बांधवांनी घरी राहूनच नमाज अदा करावी, त्यासाठी मशिदीत येऊ नये, असे आवाहन नागपुरातील मशिदीमधून करण्यात आले. यासोबतच गरजू लोकांना पोलिसांकडून मदतही केली जात आहे. ठिकठिकाणी याचा प्रत्यय येतो.