- नरेश डोंगरे
नागपूर : धंतोली परिसरात राहणारा रोहित इंगोले नामक एक युवक पोलीस नियंत्रण कक्षात सोमवारी सकाळी ११ वाजता फोन करतो. तो सांगतो की, आज माझा बर्थडे आहे आणि मला तो साजरा करायचा आहे. मात्र, लॉकडाऊन असल्यामुळे मी बाहेर जाऊ शकत नाही. बर्थ डे केक आणू शकत नाही. कसे करायचे, असा त्याचा प्रश्न असतो. त्याच्या निरागस प्रश्नाने नियंत्रण कक्षातील पोलीस कर्मचारी काही वेळेसाठी निशब्द होतात. मात्र काही क्षणांनंतरच ते त्याचे अभिनंदन करतात आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्याला घरीच राहण्याचा सल्ला देतात.दरम्यान, नियंत्रण कक्षातील ही मंडळी इंगोलेच्या वाढदिवसाचा आणि त्याच्या इच्छेचा आदर करून ही माहिती आपल्या वरिष्ठांना कळवितात. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी वरिष्ठांशी चर्चा करतात. त्यानंतर काही वेळेतच सीताबर्डी झोनचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे यांना काही सूचना दिल्या जातात. त्यानुसार पोलीस निरीक्षक पराग पोटे आपल्या सहकाऱ्यांसह बर्थडे केक घेऊन धंतोली परिसरात रोहित इंगोलेचे घर शोधण्यासाठी निघतात. त्याने सांगितलेल्या पत्त्यावर जाऊन पोलीस लाऊड स्पीकर वर त्याला घराबाहेर निघण्याची सूचना करतात. तयावेळी दुपारचे १२. ३० वाजले असतात. रोहित इंगोले घराबाहेर निघतो. घरासमोर पोलिसांची अनेक वाहने आणि मोठा पोलीस ताफा बघून काही वेळासाठी रोहित त्याच्या परिवारातील सदस्य आणि आजूबाजूची मंडळीही घाबरतात. काय झाले, अशी कुजबुज सुरू होते. आपण नियंत्रण कक्षात फोन करून मोठी चूक केल्याची त्याची भावना होते. मात्र पुढच्याच क्षणी त्याला सुखद धक्का बसतो. कारण पोलीस निरीक्षक पोटे त्याच्या हातात बर्थ डे केक ठेवतात.