लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १४ लाख रुपयांच्या आर्थिक देवाणघेवाणीत संबंध नसताना एका पोलीस निरीक्षकाने स्वारस्य दाखवले. रक्कम परत मागू नये म्हणून एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची पीडित तरुणाने गृहमंत्र्यांकडे तक्रार केली असून प्रकरण पोलिस आयुक्तालयात चौकशीला आल्यामुळे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी अडचणीत आले आहेत.राजा शरीफ (वय २८) असे तक्रार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो अनंतनगरात राहतो. गिट्टीखदानमधील अशपाक अली नामक व्यक्तीसोबत त्याची ओळख होती. घराच्या बांधकामासाठी अशपाकने राजा शरीफकडून १४ लाख रुपये उधार घेतले होते. रक्कम परत करण्यासाठी स्टॅम्प पेपरवर करारनामा झाला आणि राजाला अशपाकने दोन चेकही दिले होते. डिसेंबर २०१९ ला झालेला हा व्यवहार मार्च २०२० पर्यंत रक्कम परत केल्यानंतर संपुष्टात येईल असे ठरले होते. त्यानुसार मार्चच्या सुरुवातीपासून राजाने आपली रक्कम परत मागणे सुरू केले. ९ मार्चला रक्कम देतो असे अशपाकने सांगितले त्यामुळे राजाने त्याला फोन केला. यावेळी गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांनी फोन रिसीव केला. अशफाकला दिलेली रक्कम विसरून जा, नाही तर तुला क्राईम ब्रांचमध्ये आणून ठोकेन, अशी धमकी चौधरी यांनी त्यावेळी दिल्याचा आरोप राजा शरीफ यांनी केला आहे. राजाने यावेळी चौधरी यांना आपला व्यवहार कायदेशीर असून आपण आपली रक्कम परत का मागायची नाही, अशी विचारणा केली असता चौधरी यांनी त्याला १२ मार्चला गुन्हे शाखा युनिट तीनच्या कार्यालयात बोलावले. राजा तेथे पोहोचला यावेळी अशपाकही तेथे हजर होता. चौधरी यांनी यावेळी राजाला दमदाटी करून अशपाकला पैसे परत मागायचे नाहीत, अन्यथा तुला आतमध्ये टाकीन अशी धमकी देत पट्ट्याने मारहाण केल्याचा आरोप राजाने केला आहे. या प्रकरणाची राजाने पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे तक्रार दिली. नंतर हे प्रकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे नेले. गृहमंत्रालयातून त्याची गंभीर दखल घेण्यात आली. या पाश्र्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविली आहे.
पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न : पोलीस निरीक्षक चौधरीहा पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. आपण राजा शरीफ यांना कोणतीही मारहाण केली नसून, चौकशीसाठी त्यांना कार्यालयात बोलविले होते. तेथे त्यांना चक्कर आल्यामुळे त्यांनी दोन दिवसांनी येतो, असे सांगून कार्यालयातून निघून गेले. त्यानंतर ते रुग्णालयात अॅडमिट असल्याचे कळले, नंतर कोरोनामुळे या प्रकरणाची चौकशी थांबली. राजा यांना खोट्या तक्रारी करण्याची सवय असून, यापूर्वीही त्यांनी अनेक जणांच्या खोट्या तक्रारी केल्या आहेत, अशी खुलासा वजा प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांनी दिली.