लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदीदरम्यान नागपूर पोलीस दिवस-रात्र काम करीत आहेत. रस्त्यावर कुणीही विनाकारण फिरू नये म्हणून ते तैनात आहेतच, परंतु ते सेवाकार्यातही आघाडीवर आहेत, हे विशेष. संचारबंदीच्या या काळात नागपूर पोलीस सेवाभावी संस्थांच्या मदतीने गरीब, स्थलांतरित गरजू लोकांना जेवण, धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही केले जात आहे. गेल्या २७ मार्चपासून ही सेवा सुरू असून आतापर्यंत २ लाख ९५ हजार ३४८ गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू, धान्य, जेवण, मास्क, सॅनिटायझर, हॅन्डवॉश आणि महिलांकरिता सॅनिटरी पॅडचे वाटप पोलिसांनी केले आहे.ट्रक ड्रायव्हर, परप्रांतीय विद्यार्थी, कामगार महिला, सहारा निवासमधील नागरिक, मेट्रो कामगार, विधवा महिला, निराधार महिला, फूटपाथवरील भिकारी, शहरातील विविध ठिकाणांवरील झोपडपट्ट्यांमधील गरीब लोक, पोलीस अधिकारी व कर्मचारी, आमदार निवास येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये वैद्यकीय सेवा पुरवणारे कर्मचारी, बंदोबस्तावरील पोलीस, मेडिकल व मेयो परिसरातील गरजू, भिक्षूक आदी गरजूंना पोलिसांनी मदत केली जात आहे.लॉकडाऊन कालावधीत शहरातील गरीब, निराधार यांना जीवनावश्यक वस्तू, जेवण, औषधी साहित्याचा पुरवठा करण्यासाठी विविध सेवाभावी संस्था पुढे येत आहेत. या कामाची परवानगी मिळावी यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका आणि पोलीस आयुक्त कार्यालयात मोठ्या प्रमाणावर विनंती अर्ज करीत आहेत. जेवण, जीवनावश्यक वस्तू, औषधे, मास्क, सॅनिटायझर यांच्या वाटपात नियोजन असावे, डुप्लीकेशन असू नये, यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि अप्पर पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष नियोजन करण्यात आले आहे. यासाठी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या कार्यालयातच सिंगल विंडो सिस्टम कार्यान्वित करण्यात आली आहे. नागपूर शहरातील सर्व ३३ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नागपूर महापालिकेचे सर्व १२० झोनचे सहायक आयुक्त,जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका तसेच नागपूर शहर पोलीस असे सर्व जण त्याच्याशी कनेक्ट आहेत. तसेच सामाजिक संस्थाही याच्याशी कनेक्ट आहेत. कोण कुणाला मदत करते, त्याचा मोबाईल नंबर आदी सर्वांचे नियोजन करण्यात आलेले आहे. अप्पर पोलीस आयुक्त नीलेश भरणे हे स्वत: मदतीची जबाबदारी सांभाळत आहेत.सोशल मीडियाचा वापरगरजू लोकांना भोजन व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी पोलिसांनी सिंगल विंडो सिस्टमअंतर्गत वॉर रुम तयार केली आहे. तसेच सोशल मीडियाचाही यासाठी वापर केला जात आहे. यात नागपूर पोलीस या टिष्ट्वटर हॅन्डल, नागपूर पोलीस कमिश्नर या फेसबुक पेज तसेच कोरोना एनजीओ पोलीस अॅडमिनिस्ट्रेशन या व्हॉट्सअॅप ग्रुपचा समावेश आहे. तसेच नियंत्रण कक्षातील १०० क्रमांकावरही अशा गरजू व्यक्तींची माहिती प्राप्त होत असून कोणत्या व्यक्तीस कोणत्या ठिकाणी फूड पॅकेजची आवश्यकता आहे, याबाबत मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून मदत पोहोचवली जाते. सध्या नागपूर पोलिसांसोबत या कामात ८३ सेवाभावी संस्था जुळलेल्या आहेत.सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांचीही मदतसंचारबंदीच्या या काळात गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी शहरातील ३३ पोलीस स्टेशनमध्ये ५८ माजी सैनिक, एनसीसी गोल्डन ग्रुपचे ९८ सदस्य व सेवानिवृत्त पोलीस कर्मचारीही मदत करीत आहेत.दर दिवशी मदत वाढतेयसध्याच्या परिस्थितीत लोक जातपात धर्म विसरून गरजू लोकांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. पोलीस केवळ लीड करीत असेल तरी आमचे नियोजन व ज्या पद्धतीने प्रत्यक्ष गरजूपर्यंत मदत पोहोचत आहे त्यामुळे मदतीसाठी सेवाभावी संस्थांची संख्या दररोज वाढत आहे. नागपूरकरांच्या मदतीचा हा ओघ एक नवीन आदर्श घालून देणारा ठरला आहे.नीलेश भरणे,अतिरिक्त पोलीस आयुक्त
नागपूर पोलीस सेवाकार्यातही आघाडीवर : तीन लाख नागरिकांना केले धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 12:18 AM
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदीदरम्यान नागपूर पोलीस दिवस-रात्र काम करीत आहेत. रस्त्यावर कुणीही विनाकारण फिरू नये म्हणून ते तैनात आहेतच, परंतु ते सेवाकार्यातही आघाडीवर आहेत, हे विशेष.
ठळक मुद्देजेवण, मास्क, सॅनिटायझर, हॅन्डवॉश, महिलांकरिता सॅनिटरी पॅडही वाटले