नागपूर, दि. 1 - नागपूर गुन्हे शाखेच्या (आर्थिक सेल) पथकाने भोपाळ (मध्यप्रदेश) मध्ये छापा घालून बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. तेथून देशभरातील बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणा-या दोघांना पोलिसांनी अटक केली.धर्मेंद्रसिंग भरतसिंग राठोड (वय ३५) आणि प्रियेश उपेंद्र तिवारी (वय २५, रा. नोएडा सेक्टर, ५३ ग्राम गिझोड, उत्तरप्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. राठोड या गोरखधंद्याचा सूत्रधार असून,येथील साथीदारांच्या मदतीने गेल्या ८ महिन्यांपासून राठोड याने एमपीनगर, झोन दोन मधील रेमण्डच्या शोरूमजवळ बनावट कॉल सेंटर सुरू केले होते. रोजगार संकेतस्थळावर त्याने कॉल सेंटरची माहिती अपलोड केली होती. त्या माध्यमातून संपर्क साधणा-या बेरोजगाराना वेगवेगळळ्या क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचा दावा तो करीत होता. त्यासाठी प्रारंभी काही रक्कम नोंदणीच्या नावाखाली तर नंतर व्हीजा, पासपोर्टच्या नावाखाली हजारोंची रक्कम उकळायचा. नंतर मात्र तो संबंधित बेरोजगाराला प्रतिसाद देत नव्हता. राठोडने आपल्या कॉल सेंटरमध्ये २० तरुणींना कर्मचारी म्हणून ठेवले होते. त्यांच्या माध्यमातूनच तो बेरोजगारांशी संपर्क साधून त्यांच्याकडून रक्कम उकळत होता आणि त्यांची फसवणूक करीत होता. न्यू फुटाळा परिसरात राहणारा सतीश सुखराम बांते (वय ३४) यांच्याकडून राठोड आणि त्याच्या साथीधाराने अशाच प्रकारे ९४ हजार रुपये उकळले होते. राठोडने तक्रार नोंदवताच पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, गुन्हे शाखेच्या (आर्थिक विभाग) उपायुक्त श्वेता खेडकर आणि सहायक आयुक्त डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कॉलसेंटरचा छडा लावण्याची कारवाई सुरू झाली.
तीन दिवस झाली शहानिशा
अंबाझरीचे ठाणेदार भीमराव खंदाळे, सायबर सेलचे सहायक निरीक्षक विशाल माने, उपनिरीक्षक शिवराज जमदाडे, उपनिरीक्षक पाटणकर, नायक सूर्या, हेमराज अश्विन आणि श्रीकांत यांचे पथक शुक्रवारी भोपाळला पोहचले. आरोपी आणि त्याच्या कॉलसेंटरची माहिती काढण्यात आली. शहानिशा झाल्यानंतर तेथील पोलिसांच्या मदतीने सोमवारी दुपारी या पथकाने कॉलसेंटरवर छापा मारला. यावेळी तेथून २ लॅपटॉप, ४२ मोबाईल, ८० सीमकार्ड आणि बेरोजगाराच्या नोंदी असलेले रजिस्टर्ड जप्त केले. आरोपींना मंगळवारी नागपुरात आणण्यात आले. त्यांची चौकशी सुरू आहे.