लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - शहरात आता २४ तास एका विशिष्ट गणवेषात दुचाकीवरील पोलीस गस्त करताना दिसणार आहे. सोबतच नव्या बोलेरोतूनही पोलीस गस्त घालताना दिसणार आहे. शहरात कुठेही काही घडले अन् संबंधितांकडून कंट्रोल रूममध्ये माहिती देण्यात आली तर काही मिनिटातच पीडिताच्या मदतीसाठी पोलीस धावणार आहेत.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून शहर पोलिसांना १४ जीप आणि ७२ मोटरसायकल्स उपलब्ध करून देण्यात आल्या. या वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री नितीन राऊत यांच्याहस्ते सोमवारी सायंकाळी पोलीस मुख्यालयात एका कार्यक्रमांत करण्यात आले. यावेळी आमदार राजू पारवे, पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. पोलिसांनी कोरोनाच्या काळात बजावलेल्या कामगिरीचे पालकमंत्री राऊत यांनी यावेळी काैतुक केले.
प्रास्ताविकात पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले की, आयुक्तालयांतर्गत ७८ संवेदनशील भागाची नोंद करण्यात आली आहे. या ठिकाणी महिलांची छेड काढण्याच्या घटना घडल्याची नोंद आहे. या ठिकाणांवर दिवसरात्र पोलीस गस्त घालतील. पोलिसांचा कमीत कमी वेळेत प्रतिसाद (रिस्पॉन्स टाइम)
नवीन चार्ली योजना यानिमित्ताने आयुक्तालयात सुरू करण्यात आली आहे. ते सर्व संबंधित विभागाच्या पोलीस उपायुक्तांच्या अधिकारक्षेत्रात कार्यरत राहतील. सर्वच प्रकारच्या मदतीसाठी ११२ हा क्रमांक लवकरच सुरू होणार असून, त्यासाठीही या वाहनांची मदत होईल. संचालन करून आभार पोलीस उपायुक्त डॉ. संदीप पखाले यांनी मानले. यावेळी गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. दिलीप झळके, नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह अनेक पोलीस उपायुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यावेळी उपस्थित होते.
दोन शिफ्टमध्ये दिसतील चार्ली
आज दाखल झालेल्या दुचाक्यांना माईक सिस्टम, सायरनसह अनेक सुविधा आहेत. या वाहनावर गस्त करणाऱ्या ४६४ पोलिसांना नवीन गणवेष (डांगरी) देण्यात आला आहे. शहरातील पोलीस स्टेशन अंतर्गत ७२ बीट असून, तेथे २४ तासात ते दोन शिफ्टमध्ये कर्तव्य बजावतील.