- योगेश पांडे नागपूर - गोदामातून ई रिक्षाच्या दीड लाखाहून अधिक किमतीच्या बॅटरी चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
रविंद्रसिंग गमदुरसिंग भामरा (४८, सिद्धार्थनगर) यांचे उप्पलवाडी येथे प्लॅटिनियम पॉलिपॅक नावाचे गोदाम आहे. तेथे ई-रिक्षा ठेवलेल्या असतात. १२ डिसेंबर रोजी अज्ञात चोरट्याने गोदामात प्रवेश करून तेथील ई-रिक्षातील तसेच कपाटात ठेवलेल्या १२ व्होल्टच्या ७६ बॅटऱ्या लंपास केला. त्यांची किंमत १.५२ लाख इतकी होती. भामरा यांच्या तक्रारीनंतर कपिलनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू केला. सीसीटीव्ही व खबऱ्यांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी समीर अली जावेद अली (२०, म्हाडा कॉलनी इमारत, नारी) याला ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता तेथे ४ बॅटरी सापडल्या.
पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली असता त्याने गोविंद काशीराम साखरे (२१, स्वामीनगर, नारी मार्ग) व आकाश विजय पाली (२३, म्हाडा क्वॉर्टर) यांच्यासोबत चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी इतर आरोपींनादेखील अटक केली. त्यांनी काही बॅटरी रंजित अच्छेलाल शाहू (२७, शनीमंदिराजवळ, कळमना) याला विकल्या होत्या. पोलिसांनी त्यालादेखील अटक केली. आरोपींनी कपिलनगरात ७, जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन व पाचपावलीतदेखील एक गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून एकूण १०३ बॅटरी, दुचाकी असा २.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, भरत शिंदे, राजेंद्र यादव, ताळीकोटे, नागरिक, वारंगे, धात्रक, आवळे, ठाकूर, प्रविण इवनाते, इमरान शेख, सुरेश वरूडकर, सुधीर वालदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.